
बिहार विधानसभा निवडणुकीत जदयु-भाजपची ‘एनडीए’ काठावर पास झाली आहे. 243 सदस्य असलेल्या विधानसभेत ‘एनडीए’ला 125 जागा मिळाल्या आहेत. तरुण नेते तेजस्वी यादव यांचा राजद 75 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे अध्यक्ष नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होणार, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिले आहेत.
कोरोनामुळे लांबलेली मतमोजणी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. गुरुवारी पहाटे सर्व 243 मतदारसंघातील निकाल लागले. बहुमतासाठी 124 ही मॅजिक फिगर आहे. भाजपला 74, जदयु 43, हम 4 आणि व्हीआयपी 4 असे एनडीएचे संख्याबळ 125 आहे. एनडीएला काठावर बहुमत आहे. नितीशकुमार यांच्या जदयुला मोठा फटका बसला असून, त्यांचा पक्ष तिसऱया क्रमांकावर फेकला गेला आहे.
मंगळवारपासून नितीशकुमार आपल्या निवासस्थानी होते. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर बुधवारी दुपारी ट्विट करून बिहारच्या जनतेचा कौल मान्य असून, त्याबद्दल जनतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
सुशिलकुमार मोदी म्हणाले कोणताही संभ्रम नाही
भाजपला 74 जागा आणि जदयु 43 जागा मिळाल्या आहेत. यामुळे ‘एनडीए’चा मुख्यमंत्री कोण? यावर राजकीय वर्तुळात तर्पवितर्प लढविले जात आहे. मात्र, बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते सुशीलकुमार मोदी म्हणाले, आमच्यात कोणताही संभ्रम नाही. नितिशकुमार हेच मुख्यमंत्री बनतील. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालेल. निवडणुकांमध्ये असे होत असते. कोणी अधिक जागा जिंकतो, कोणी कमी. मात्र, आम्ही समान भागीदार आहोत, असे त्यांनी सांगितले.
अनेकांचा निसटता विजय
- अनेक मतदारसंघात अटीतटीची लढत पहायला मिळाली. अनेकांना निसटता विजय मिळाल्यामुळे विधानसभेची लॉटरी लागली.
- हिसला मतदारसंघात जदयुचे पृष्णामुरारी शरण अवघ्या 12 मतांनी विजयी झाले. त्यांनी राजद उमेदवार शक्तीसिंह यादव यांचा पराभव केला.
- बधिचा मतदारसंघात जदयुचे सुदर्शन कुमार यांनी काँग्रेसचे गजानन शाही यांचा 113 मतांनी पराभव केला.
- रामगढ मतदारसंघात राजदचे सुधारकर सिंह 189 मतांनी विजयी झाले. त्यांनी बसपाच्या उमेदवाराचा पराभव केला.
- माटीहानीमध्ये लोजपचे एकमेव विजयी उमेदवार राजकुमार सिंह यांनी जदयुचे नरेंद्र सिंह यांचा 333 मतांनी पराभव केला.
- भोरचे मतदारसंघात जदयुचे सुनिल कुमार यांनी भाकपचे जितेंद्र पासवान यांचा 462 मतांनी पराभव केला.
राजद नंबर वन
तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (राजद) 75 जागा जिंकून नंबर वन पक्ष ठरला आहे. काँग्रेस 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. महागठबंधनचे संख्याबळ 110 आहे. या निवडणुकीत ‘एनडीए’तून बाहेर पडलेले चिराग पासवान यांना केवळ एक जागा मिळाली. एमआयएम 5 तर बसपा एका जागेवर विजयी झाली आहे.
बिहारमध्ये सत्य आणि विश्वास जिंकला आहे. तरुण, गरीब, शेतकरी जिंकला आहे. अपेक्षांचा विजय झाला आहे. बिहारमधील जनता जागरूक आहे. आम्ही नितिशकुमार यांच्या नेतृत्वात विकासाचा संकल्प सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू!
नरेंद्र मोदी, पंतप्रधान






















































