गुगल मॅपवर रस्ता शोधताना गाडी धरणात शिरली, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

आजकाल पत्ता शोधण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुगल मॅप. मॅपच्या साहाय्याने लोकेशन ऑन करून हव्या त्या पत्त्यावर तुम्हाला जाता येऊ शकतं. पण, कधीकधी मॅपवर अतिविसंबून राहण्यात चूक होऊ शकते. अशीच चूक एका माणसाच्या जिवावर बेतली आहे.

गुगल मॅप्सवर पत्ता शोधण्याच्या नादात गाडी धरणात शिरून एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. सतीश घुले (34) असं या व्यक्तिचं नाव आहे. व्यावसायिक असलेले सतीश यांनी त्यांचे मित्र गुरू आणि समीर यांच्यासमवेत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसूबाईला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, त्यांच्यापैकी कुणालाही या प्रवासाचा अनुभव नव्हता.

या शनिवारी त्यांनी एकाच गाडीने गुगल मॅपच्या मदतीने पत्ता शोधत जाण्याचं निश्चित केलं आणि ते पुण्याहून निघाले. गुगल मॅपच्या आधारे ते गाडी चालवत निघाले. गुगल मॅपने त्यांना वाटेत कोटुल ते अकोले हा रस्ता सगळ्यात जवळचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांनी शहानिशा न करता सरळ गाडी त्याच रस्त्याने नेली. पण, त्या वाटेत पिंपळगाव खांड धरण होतं.

गाडी धरणात शिरल्याने ती बुडू लागली. तेव्हा या तिघांनी मदतीसाठी ओरड केली. त्यांचा आवाज ऐकून तिथे आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला. पण, गुरू आणि समीर यांना वाचवण्यात त्यांना यश आलं. सतीश यांचा बुडून मृत्यू झाला.

पिंपळगाव खांड धरणावरचा पूल पाण्याखाली गेल्याने धरणाच्या बाजूचा रस्ता हा पावसाळ्यादरम्यान बंद ठेवण्यात आला होता. ही बाब स्थानिकांना माहीत होती. मात्र, निव्वळ गुगल मॅपवर अवलंबून राहिल्याने या तिघांवर हा प्रसंग ओढवला.