
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखातं होतं. त्यावेळी ते गृहखात्याच्या माध्यमातून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवायचे. मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज खासगी लोकांकडे देऊन सरकारी गोपनीयता धाब्यावर बसवली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला आहे.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना माहिती महासंचालक पदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱयांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आला आहे.
सरकारी गोपनीयताही धाब्यावर बसवली
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱयांच्या वेतनावर दरमहा 7 लाख 70 हजार रुपये खर्च होत होते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सरकार बाहेरील खासगी लोकांकडे देऊन त्यांनी सरकारी गोपनीयता धाब्यावर बसवली होता, असा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.































































