
जॉनी बेअरस्टोचा शतकी (वन डेतील 11 वे) धमाका… बेन स्टोक्सची वादळी खेळी… अन् जेसन रॉयच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने हिंदुस्थानचा 6 गडी व 39 चेंडू राखून धुव्वा उडवला. कुलदीप यादव व कृणाल पांडय़ा या फिरकी गोलंदाजांचे अपयश हिंदुस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरले. या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 124 धावांची खेळी साकारणाऱया जॉनी बेअरस्टोची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. आता तिसरा व अखेरचा सामना रविवारी पुण्यातच रंगणार आहे.
पुन्हा शतकी सलामी
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 337 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडच्या सलामीवीरांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी करताना विजयाची भक्कम पायाभरणी केली. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या जोडीने 110 धावांची भागीदारी रचली. दोघांनी हिंदुस्थानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. रोहित शर्माच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे जेसन रॉय 55 धावांवर धावचीत झाला. या खेळीत त्याने एक षटकार व सात चौकार मारले.
शतक हुकले पण…
जेसन रॉय बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स या जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. दोघांनी दुसऱया विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्सने अवघ्या 52 चेंडूंत दहा सणसणीत षटकार व चार दमदार चौकारांसह 99 धावांची खेळी साकारली. भुवनेश्वरकुमारच्या बाऊन्सरवर तो यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद झाला, पण तोपर्यंत त्याने इंग्लंडचा विजय जवळपास निश्चित केला होता.
सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग
जॉनी बेअरस्टोने 112 चेंडूंत 124 धावांची संस्मरणीय खेळी केली. ही खेळी त्याने सात षटकार व 11 चौकारांसह सजवली. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर तो विराट कोहलीकरवी झेलबाद झाला. याच षटकांत त्याने जोस बटलरला शून्यावरच त्रिफळाचीत केले. त्यानंतर डेव्हिड मलान (नाबाद 16 धावा) व लियाम लिव्हिंगस्टोन (नाबाद 27 धावा) यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हिंदुस्थानविरुद्ध सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्यात इंग्लंडने बाजी मारली. या लढतीत 34 षटकारांचा पाऊस पडला हे विशेष.
37 धावांत सलामीवीर बाद
इंग्लंडने याही लढतीत नाणेफेक जिंकली. ओएन मॉर्गनच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी जोस बटलरकडे सोपवण्यात आली. त्याने पुन्हा एकदा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. उंचपुरा वेगवान गोलंदाज रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर मागील लढतीतील हीरो शिखर धवन स्लिपमध्ये उभ्या बेन स्टोक्सकरवी 4 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली ही जोडी जमेल असे वाटत असतानाच सॅम करणच्या गोलंदाजीवर मुंबईकर रोहित शर्मा अदिल रशीदकरवी 25 धावांवर बाद झाला. हिंदुस्थानची अवस्था 9 व्या षटकात 2 बाद 37 धावा अशी झाली.
121 धावांची सणसणीत भागीदारी
विराट कोहली व लोकेश राहुल या जोडीने हिंदुस्थानचा डाव सावरला. दोघांनी तिसऱया विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचली. विराट कोहलीने या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने 79 चेंडूंत एक षटकार व तीन चौकारांसह 66 धावांची खेळी केली, मात्र याही डावात तो शतकापासून दूरच राहिला. अदिल रशीदच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक जोस बटलरकरवी झेलबाद झाला आणि जोडी तुटली.
पंतचा तडाखा
लोकेश राहुल व यष्टिरक्षक रिषभ पंत या जोडीने टीम इंडियासाठी मोलाची कामगिरी बजावली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 113 धावांची मौल्यवान भागीदारी रचली. लोकेश राहुलने वन डेतील पाचवे शतक अगदी दिमाखात पूर्ण केले. त्याने 114 चेंडूंत दोन षटकार व सात चौकारांसह 108 धावांची जबरदस्त खेळी साकारली. पंतने अवघ्या 40 चेंडूंत सात गगनभेदी षटकार व तीन घणाघाती चौकारांच्या सहाय्याने 77 धावांची खेळी केली.



























































