
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधणारे तरुणच आता रोजगारनिर्मिती करण्याइतके सक्षम होणार आहेत. राज्यातील आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘उद्यम शिक्षा, उद्योजक मानसिकतेचा विकास’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात नवीन शिक्षणप्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगारनिर्मिती करू शकतील.
उद्यम लर्निंग फाऊंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (डीव्हीईटी) आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज झाले. हा उपक्रम म्हणजे 50 तासांचा एक प्रायोगिक अभ्यासक्रम आहे. आत्मविश्वास, आत्मजागरूकता, जिद्द आणि स्वतंत्र निर्णय क्षमता या चार मानसिकतांचा विकास या अभ्यासक्रमातून केला जाईल. या उपक्रमात विद्यार्थी उद्योगक्षेत्रातील यशस्वी व अनुभवी व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधू शकतील.
या उद्घाटनप्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, डीव्हीईटाचे संचालक दिपेंदर कुशवाह, उद्यम लर्निंग फाऊंडेशनचे मेकिन महेश्वरी आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी राज्यातील 32 आयटीआय संस्थांची निवड करण्यात आली असून 90 हजारांहून अधिक विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत.


























































