
‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा पाय आणखी खोलात गेला आहे. नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुह्यात त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.
रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱया बाळ बोठेला पोलिसांच्या पथकाने हैदराबाद येथून पकडल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला दोनदा पोलीस कोठडी सुनावली. बोठे याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर महिला लैंगिक अत्याचार व विनयभंगप्रकरणी त्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतल होते. यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपल्याने आज बोठे याला पुन्हा नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, याआधीच मंगल भुजबळ यांनी बोठे याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे बोठे याला ताब्यात घेण्यासाठी तोफखाना पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यामुळे बोठे याला तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये भुजबळ यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी भागवत दहिफळे यांचासुद्धा समावेश आहे. दहिफळे याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. रेखा जरे खूनप्रकरणात बोठे याला आता नगर शहरातील कोतवाली व तोफखाना पोलिसांमध्ये दाखल झालेल्या गुह्यांमध्ये वर्ग केल्यामुळे आता पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून तपासही सुरू केला आहे. बोठे याचा हस्तगत केलेला आयफोन फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. त्यामध्येसुद्धा अनेक बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे.
नाशिक कारागृहात ठेवण्याची बोठेची मागणी
n नगरमधील एका नामांकित वृत्तपत्रात निवासी संपादक म्हणून काम करीत असताना बोठे याने अनेक प्रकरणे उघडकीस आणली होते. यांतील बहुतांशी आरोपी हे नगरच्या सबजेल व पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आपणास या ठिकाणी ठेवल्यास आपल्या जीवितास धोका असल्याने नाशिक कारागृहात ठेवावे, अशी लेखी मागणी आरोपी बोठे याच्या वतीने वकील संकेत ठाणगे यांनी पारनेर न्यायालयात केली होती. या मागणीवर अद्यापि निर्णय न झाल्याने बोठे याला कोणत्या कारागृहात ठेवणार, याबाबत अद्यापि संभ्रम आहे

























































