पूर्ण फी भरा, अन्यथा प्रवेश रद्द; कोरोनाने डोके वर काढताच शाळांची वसुली सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने डोके वर काढताच पालकवर्गाच्या उत्पन्नाच्या मार्गात अडचणी येण्याआधीच खासगी शाळांनी नवीन शैक्षणिक वर्षातील फी वसुली सुरू केली आहे. पूर्ण फी भरा, अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येतील असा इशारा काही शाळांनी पालकांना दिल्याने यंदाही कोरोना निर्बंधात शालेय प्रवेशासाठी पालकांचा संघर्ष सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी काही पालकांनी युवासेनेकडे तक्रार केली असून युवासेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पालकांची बाजू मांडण्यात येणार आहे.

प्रभादेवी येथील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलने सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील सर्व फी एकत्र भरण्याची सूचना पालकांनी देण्यात आली आहे. सर्व फी न भरल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल असे पत्रकच या शाळेने जारी केले आहे. फी भरण्यासाठी शाळेने तुकडीनिहाय तारखा दिल्या असून संबंधित तारखेला फी न भरणारे पालक प्रवेश घेण्यास उत्सुक नसल्याचे समजण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर सुरू असताना शाळांनी अशा प्रकारे वसुली सुरू केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी स्पष्ट केले.