
मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्याने कारवाई केली. राणे यांच्यावरील कारवाई unconstitutional म्हणजे घटनाबाहय़ असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री कोणीही असोत, त्यांचा जाहीर उपमर्द करण्याचा अधिकार कोणालाच नाही. राणे हा अपराध वारंवार करीत राहिले! त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहेत.
केंद्रातले एक मंत्री श्री. नारायण राणे महाराष्ट्रात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आले. त्या यात्रेची त्यांनी येडय़ांची जत्रा केली. मोदी सरकारातील अनेक मंत्री देशभरात अशा जन आशीर्वाद यात्रा करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील फिरत आहेत. त्या सर्व यात्रा सुरळीत पार पडत आहेत. फक्त श्री. राणे यांनी परंपरेने गोंधळ घातला. त्यामुळे मोदींच्या यात्रेचे महत्त्वच नष्ट झाले. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर आहे. विरोधात बसणे त्यांना कमीपणाचे वाटते. त्याच न्यूनगंडातून भाजप राज्य सरकारवर घाणेरडय़ा पद्धतीने हल्ले करीत आहे. स्वतः हल्ले करून थकले तेव्हा ते काम त्यांनी बाहेरून आलेल्या राणे यांच्यासारख्या नेत्यांना दिले. राणे जे करीत आहेत त्यामुळे जत्रेचा तंबूच उधळला गेला. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीने परंपरा, प्रतिष्ठा सोडली की काय घडते, याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. गेले चारेक दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियाला चोवीस तास रटरटणारे खाद्य मिळाले, पण राज्याची इभ्रत या सर्व प्रकरणात मातीमोल झाली. केंद्रीय मंत्री राणे हे गेली वीस वर्षे शिवसेना व उद्धव ठाकरेंवर असंसदीय भाषेत बोलत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांवर ते व त्यांचे चिरंजीव असभ्य भाषेत बोलत असतात. त्याची दखल कोणी घेत नाही, पण श्री. राणे आता केंद्रीय मंत्री आहेत व उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना थोबाडीत मारण्याची भाषा केंद्राचे एक मंत्री असलेले राणे करतात व त्यांच्या बाजूला बसलेले भाजपचे पुढारी हतबलतेने ही नौटंकी पाहतात. राणे यांच्या घाणेरडय़ा वक्तव्याचे पडसाद उमटले. राणे यांच्यावर कायद्याने कारवाई झाली. अटक करून जामीन मिळाला. राणे यांच्या असभ्य वर्तणुकीचे समर्थन फडणवीस-चंद्रकांत पाटील यांच्यापासून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा करतात. गृहमंत्री अमित शहा यांनीही श्री. राणे यांना फोन करून सांगितले, ‘‘राणेजी, हम आपके साथ है!’’ हे सत्य असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा हा अपमान आहे! महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्यांच्या मागे ‘दिल्ली’ प्रत्येक वेळी उभी का राहते?
तालिबान्यांचे राज्य?
श्री. राणे इतक्या वर्षांत कधी शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर गेले नाहीत, पण आता जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला गेले. हा त्यांच्या राजकारणाचा व शिवसेनेस डिवचण्याचा भाग होता. स्मृतिस्थळावरून राणे म्हणाले, ‘‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला आशीर्वाद दिले असते.’’ राणे यांचे हे विधान हास्यास्पद आहे. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्या वेळी रंगशारदात बाळासाहेबांनी केलेले ‘आशीर्वादपर’ भाषण राणे यांनी पुन्हा ऐकायलाच हवे. श्री. राणे यांच्या शिवसेनेवरील असभ्य वक्तव्याने आज भाजपला गुदगुल्या होत असतील, पण या अस्वलाच्या गुदगुल्या आहेत हे भविष्यात समजेल. मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी श्री. राणे यांना अटक केली. यात सरकारचे काय चुकले? पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणी यापूर्वी अनेक संशयितांना अटक झाली आहे. त्यापैकी अनेकजणांवर देशद्रोहाचे आरोप लावून त्यांना आजही तुरुंगात डांबले आहे. 84 वर्षांचे स्टेन स्वामी हे त्यापैकी एक होते. त्यांना जामीनही मिळू दिला नाही व शेवटी ते तुरुंगातच मरण पावले. राणे यांनी एकदा नाही, वारंवार धमकीवजा असभ्य भाषेचा वापर केला. अटकेनंतर पुन्हा सुरू केलेल्या यात्रेत श्री. राणे हे अनेकांवर व्यक्तिगत स्वरूपाचे, असभ्य आरोप करीत आहेत. मोदी यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा हा हेतू नव्हता! केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी स्वतःची तरी प्रतिष्ठा ठेवायला हवी होती. पुन्हा राणे यांच्यावर कारवाई केली म्हणून महाराष्ट्रात तालिबानी राजवट सुरू झाल्याचा साक्षात्कार श्री. देवेंद्र फडणवीस यांना व्हावा? ज्या महाराष्ट्राचे ते काल मुख्यमंत्री होते ते राज्य तालिबान्यांचे? औरंगजेब, अफझल खान, शाहिस्ते खान अशा तालिबानी राजवटीचा अस्त करून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे राज्य ‘तालिबानी’ म्हणणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी आहे. राणे यांच्या वक्तव्याची ‘री’ ओढण्यात भाजपने स्वतःलाच चिखल फासून घेतला. राणे हे जामिनावर सुटले व त्यांच्यावर महाडच्या कोर्टाने निर्बंध लादले. त्यांनी हजेरी लावावी, त्यांच्या आवाजाचा नमुना घ्यावा, असे सांगितले. तरीही राणे सांगतात, ‘‘मला अटक झालीच नाही.’’ मग भाजप समर्थक राणेंच्या अटकेविरोधात आरडाओरड का करीत आहेत? राणे जामिनावर सुटताच म्हणाले, ‘‘आता पहा, ठाकरे सरकार लवकरच पडेल!’’ राणे यांची ही अशी विधाने अलीकडे चेष्टेचा विषय बनत आहेत. आडवाणी यांच्या अटकेनंतर व्ही. पी. सिंगांचे केंद्रातील सरकार पडले होते, पण राणे यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार आहे, असे स्वप्न काही लोक बघत आहेत. तेव्हा राज्यपालांनी पहाटेपासूनच राजभवनाचे दरवाजे उघडे ठेवून बसावे, हेच बरे! सरकार पाडण्याचे किडे विरोधी पक्षाच्या डोक्यात सदैव वळवळत असतील तर ते त्यांच्या बिघडत्या प्रकृतीसाठी बरे नाही. राणे यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान जामिनावर सुटल्यानंतर केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही महाराष्ट्राचा प. बंगाल होऊ देणार नाही!’’ हे विधान प. बंगाल, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अपमान करणारे आहे. प. बंगाल हा काय देशाचा टाकाऊ भाग वाटला काय? हा प्रश्न समस्त बंगाली जनतेने राणे व भाजपला विचारला पाहिजे. प. बंगाल ही महाराष्ट्राप्रमाणेच विचारवंत, सामाजिक चळवळ, स्वातंत्र्यलढय़ातील क्रांतिकारकांची भूमी आहे. महाराष्ट्रात जसे महात्मा फुले, शाहू निर्माण झाले तसे प. बंगालात राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर निर्माण झाले. वंदे मातरम्, जन गण मन या राष्ट्रगीतांचा जन्म ज्या मातीत झाला, ती माती तुम्हाला अप्रिय झाली? कारण तेथील जनता शहाणी व प्रखर राष्ट्रभक्त आहे. याच जनतेने ‘वंदे मातरम्’ भूमीत भाजपच्या दारुण पराभवाचा खिळा ठोकला. प. बंगाल ही स्वातंत्र्यलढय़ातील महान क्रांतिकारकांची भूमी. वीर सावरकरांबरोबर अंदमानात प. बंगालचेच क्रांतिकारक जास्त होते. साहित्य, कला, संगीत, चित्रपट असा भव्य पसारा मांडलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमीचा इतका द्वेष राणे व्यक्त करतात. हे भाजपचे अधिकृत धोरण आहे काय? प. बंगाल व महाराष्ट्राची तुलना ही गौरवाचीच बाब आहे. महाराष्ट्राच्या जनतेने प. बंगालच्या जनतेचा आदर्श ठेवायला काहीच हरकत नाही. क्रांतीचे पाणी क्रांतीलाच मिळते! श्री. राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेत सर्व क्रांतिकारकांचाच अपमान केला. वीर सावरकरांवर असभ्य भाषेत राणेपुत्रांनी केलेली विधाने आजही सोशल मीडियावर आहेत. भाजप त्यावर काय बोलणार?
unconstitutional अटक?
नारायण राणे यांना केलेली अटक ही घटनाविरोधी आहे. (unconstitutional) आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांपासून महाराष्ट्राचे श्री. फडणवीस यांच्यापर्यंत सगळेच सांगत आहेत. आपल्या पक्षाच्या माणसाचा बचाव करणे इथपर्यंत ठीक, पण त्या कायदेशीर कारवाईस घटनाबाह्य ठरवणे हेच unconstitutional आहे. श्री. राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असंसदीय व अनकॉन्स्टिटय़ुशनल भाषेत एकेरी पद्धतीने केलेला उल्लेख जे. पी. नड्डा व फडणवीस यांना मान्य आहे काय? नड्डा हे हिमाचल प्रदेशातून येतात. ते त्यांच्या राज्यात जाऊन तेथील मुख्यमंत्र्यांना ‘‘कानाखाली मारीन’’ अशी धमकीची भाषा करू शकतात का? याचे उत्तर ‘‘होय’’ असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करणाऱ्यांची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी. राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर मुंबईत उतरतात, पूरग्रस्तांना भेटण्यासाठी कोकणात जातात, तेथे शासकीय अधिकाऱ्यांसमोर बेभानपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उद्धार करतात, ‘तुमचा मुख्यमंत्री गेला उडत!’ असे बोलतात. हे त्यांचे बेताल बोलणे कॉन्स्टिटय़ुशनल आहे काय? हे श्री. नड्डा व फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला समजावून सांगायला हवे. राणे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या मर्यादा पाळायला तयार नाहीत व त्यांच्यातल्या बेभानपणास भाजप खतपाणी घालत राहिला. राणे गेल्या काही दिवसांत काय काय बोलले ते पहा-
1) राणे म्हणतात, ‘‘अरे, मी काय नॉर्मल माणूस आहे काय?’’ मला हात लावून बघाच!
2) राणे म्हणतात (साहिल जोशींना दिलेल्या मुलाखतीत) ‘‘आम्ही वर बसलोय (म्हणजे केंद्रात). महाराष्ट्र वरच्या लोकांशी काय संघर्ष करणार?’’ राणे यांची ही विधाने महाराष्ट्राला कमी लेखणारी आहेत. फडणवीस व इतरांना महाराष्ट्राला कमी लेखणे मान्य आहे काय? दिल्लीशी संघर्ष करूनच महाराष्ट्राने ‘मुंबई’ मिळवली हे शिवसेना सोडल्यावर राणे विसरलेले दिसतात.
ही कसली संस्कृती?
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जे घडवले जात आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली हे दुःख समजू शकतो. पण म्हणून महाराष्ट्रातील टोलेजंग व्यक्ती व राज्याच्या संस्कृतीवर हल्ला करत राहणे योग्य नाही. भारतीय जनता पक्षाची हळद लावलेला एक नवाकोरा आमदार देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर घाणेरडय़ा भाषेत जाहीर विधान करतो व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यावर फक्त सारवासारवी करून अप्रत्यक्ष अशा बेतालपणास फूस देतात. हे कसले संस्कार? उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला? राणे महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारची विधाने करीत आहेत तो केंद्रीय मंत्री म्हणून मर्यादांचा, परंपरांचा भंग आहे व पंतप्रधान मोदी यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे फार मोठे परिणाम भाजपला भोगावे लागतील. भारतीय जनता पक्ष हा संस्कार, संस्कृती, नैतिकतेवर भर देणारा पक्ष आहे. निदान त्यावर त्यांची प्रवचने तरी असतात, पण संस्कार व संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आले की हात वर करायचे. एका गुजरात निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच’ असा करताच भाजपने मोठाच हल्लाबोल केला. मोदी तर जाहीर सभांतून ‘‘मला ते नीच म्हणाले हो।़।़’’ म्हणून अश्रू ढाळत होते. मणिशंकर यांच्या ‘नीच’ शब्दाची गांभीर्याने दखल घेऊन काँग्रेसने अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्याची हिंमत व नैतिकता दाखविली. नारायण राणे यांनीही तोच गुन्हा केला, पण भाजप त्यांना सरळ पाठीशी घालत आहे.
फडणवीस मागे पडतील
नारायण राणे यांना राजकीय मर्यादा आहेत. त्यांचे सगळय़ात मोठे भांडवल म्हणजे ते बोलताना, वागताना मर्यादांचे भान ठेवीत नाहीत. हे भांडवल तोकडे पडत असल्यामुळेच भाजपमध्ये मर्यादा सोडून वागणारे बाहेरचे लोक वापर करण्यासाठी लागतात. या बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलण्याची सुतराम शक्यता नाही. उलट या सगळय़ांचे परिणाम भाजपास भोगावे लागतील. भाजपास अस्वस्थता, अस्थिरतेची वाळवी लागेल. राणे यांच्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये बहुजन समाज विरुद्ध इतर अशी सरळ फाळणी होईल. राणेच ती करतील. त्या विघटनास सुरुवात झाली आहे. या सगळय़ा वातावरणात भाजप स्वतःची ओळख आणि अस्तित्व हरवताना दिसत आहे. आज राणे, लाडसारखे नेते भाजपचा मुखवटा म्हणून वेगळे प्रताप घडवीत आहेत व फडणवीस मागे पडले आहेत. आशिष शेलारांसारखे नेते ठरवून बाजूला केले आहेत. राजकीय मतभेदांपलीकडचे हे विचार आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या घरघरीची ही सुरुवात आहे. शिवसेना सत्तेत येण्यासाठी बधत नाही याची खात्री पटल्यावर राणे यांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळात घेतले गेले. त्यामुळे सगळय़ात जास्त फटका भविष्यात भाजपलाच बसेल हे कोणीही सांगेल, पण राजकारण हे वाऱ्याच्या झोताप्रमाणे फिरत असते व त्या झोतात फुलपाखरांबरोबर कीटकही उडत असतात. तसे आता महाराष्ट्रात सुरू आहे. यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत राजकारणाचा पाया रचला. तो हलताना दिसत आहे. वसंतराव नाईकांपासून शरद पवारांपर्यंत, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीसांपर्यंत कोणीच मर्यादाभंग केला नाही. तीच परंपरा उद्धव ठाकरे चालवत आहेत. राणे यांनी आता ज्या भाषेचा वापर केला, त्याची तुलना भाजपवाले बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीशी करीत आहेत. हा तर मूर्खपणाचा कळस आहे. राणेंच्या बेताल वक्तव्यांची तुलना बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीशी करणे हा अपराध आहे. महान व्यंगचित्रकार, पत्रकार, फर्डे वक्ते, लोकनेते शिवसेनाप्रमुख, ज्यांनी महाराष्ट्र घडवला व अनेक संकटांतून वाचवला. याच ठाकरे शैलीचे ‘कवच’ हिंदुत्वाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीस लाभले. याच ठाकरे शैलीने, त्यांच्या फटकाऱ्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव घडवून आणला, त्या ठाकरे शैलीची तुलना राणेंच्या वक्तव्याशी करणे म्हणजे वैचारिक गोंधळाचे लक्षण आहे. हा गोंधळ बरा नाही. भाजपात इतका वैचारिक गोंधळ कधीच उडाला नव्हता.
घडी विस्कटेल
राणे यांना अटक व सुटका झाली. त्यामुळे हे प्रकरण आता कायद्याच्या चौकटीत पाहायला हवे. या सर्व प्रकरणाचा मुंबई महानगरपालिका निवडणुकांशी संबंध जोडणे निरर्थक आहे. कोकणातील शिवसेना वाढीत आपले योगदान आहे असा दावा जामिनावर सुटताच श्री. राणे करतात. त्यावर कोणी विश्वास ठेवायचा? शिवसेना वाढीत योगदान असणारा कोणताही नेता स्वतःच्याच मतदारसंघात पराभूत होत नाही. राणे यांचा पराभव कोकणात शिवसेनेनेच केला व ते भाजपच्या मेहरबानीने राज्यसभेत गेले. श्री. राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळय़ात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. टीका करणे व स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळय़ांचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केले. एक दिवस हीच वेळ ते फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर आणतील. हे राजकारण खरे नाही, असे श्री. फडणवीसांनी एकदा राणे यांना समोर बसवून समजावून सांगायला हवे. कारण फडणवीस यांचा उल्लेख श्री. राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून केला आहे. राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. ‘‘तुम्ही बिनबापाचे आहात काय?’’ असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल.
महाराष्ट्रातील चार शहाण्यांनी पुढे येऊन राज्यातील पेंढाऱ्यांचे कान उपटावेत, अन्यथा राज्याची घडी विस्कटेल.
Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]


























































