
महानंद डेअरी लष्कराच्या नॉर्दन कमांड आणि ईस्टर्न कमांडला यंदा तब्बल 38 लाख लिटर टेट्रापॅकिंग दुधाचा पुरवठा करणार आहे. डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱया जवानांना चांगल्या प्रतीचे दूध मिळावे म्हणून लष्कर आणि महानंदमध्ये करार झाला आहे. या प्रतिलिटर दुधाचा सरासरी दर 62 रुपये एवढा असणार आहे. त्यामुळे डेअरीला जवळपास 18 कोटी रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे.
जवानांना 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर या वर्षभराच्या काळात आवश्यक असलेल्या दुधाच्या खरेदीबाबत लष्कराकडून ऑगस्टमध्ये संबंधित दूध पुरवठादाराबरोबर करार केले जातात. सदरचे दूध उच्च प्रतीचे आणि सहा महिन्यांपर्यंत टिकणाऱया टेट्रापॅकिंगमध्ये उपलब्ध करून द्यावे लागते. त्यानुसार लष्कराच्या नॉर्दन कमांडने जम्मू-कश्मीर परिसरातील गुलमर्ग, बारामुल्ला, धारमुंड, बनिहाल, ठलेला आणि भालरा या डेपोसाठी 20 लाख लिटर तर ईस्टर्न कमांडने शिलाँग, लिकाबली, हसिमारा, याथांग या डेपोंसाठी 18 लाख लिटर दुधाच्या खरेदीबाबत करार केला असल्याची माहिती महानंद डेअरीच्या असेप्टिक प्लाण्टचे प्रमुख आर. के. पाटील यांनी दिली. त्यामुळे डेअरीला जवळपास 18 कोटी रुपयांचा व्यवसाय मिळणार असून त्यामधून दीड-दोन कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे.
कोरोनाकाळात मागील वर्षी दोन लाख लिटर दुधाचा अतिरिक्त पुरवठा
लष्कराने मागील वर्षी महानंद डेअरीकडून 32 लाख लिटर दुधाच्या खरेदीबाबत करार केला होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे लष्कराला इतर दूध डेअरींकडून कराराप्रमाणे दूध उपलब्ध होऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी महानंदकडे अतिरिक्त दुधाची मागणी केली होती. त्याची दखल घेत महानंद डेअरीने तब्बल दोन लाख अतिरिक्त दुधाचा पुरवठा केला आहे.


























































