
मंगळवारी रोजी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. या पावसाने खेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून, अंबाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून, शिवना टाकळी प्रकल्प तुडुंब झाला आहे. वैजापूर तालुक्यातील मुंबई – नागपूर महामार्गावरील हडस पिंपळगाव शिवारातील ढेकू नदीला 2010 सालानंतर महापूर आला आहे. भटाणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. कन्नड तालुक्यातील अंबाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून, यामुळे कन्नडच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात 94 टक्के इतका पाणीसाठा आहे. रात्री 10 वाजता दरवाजे क्र. 1,3 व 5 प्रत्येकी एक फुटाने वर उचलून 3 हजार 240 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. लासूर। वैजापूर महामार्गावर हडस पिंपळगावजवळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन एका बाजूने वाहतूक सुरू केली. रत्नपूर तालुक्यातील वेरुळ येथे 3 मि.मी., सुलतानपूर 9 मि.मी., बाजारसावंगी 4 मि.मी. तालुक्यात एकूण 16 मि.मी. पावसाची नोंद झाली.
फुलंब्री तालुक्यात फुलंब्री 5 मि.मी., वडोद बाजार 8 मि.मी., आळंद 6 मि.मी., पिरबावडा 7 मि.मी. एकूण 26 मि.मी. पावसाची नोंद झाली. सोयगाव तालुक्यात सोयगाव 11 मि.मी., बनोटी 15 मि.मी., सावळदबारा 35 मि.मी., जरंडी 9 मि.मी. पाऊस झाला. तर एकूण 70 मि.मी. पाऊस पडला.


























































