
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानने सरकार स्थापन केले आहे. मात्र, तालिबान्यांसमोर पंजशीरने अद्याप हार मानलेली नाही. तालिबान्यांचे सरकार अवैध असून आम्ही आमचे समांतर सरकार चालवणार असल्याचे पंजशीरच्या नेशनल रेजिस्टेंट फ्रंटने (एआऱएफ) स्पष्ट केले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला असला तरी त्यांना अद्याप पंजशीर ताब्यात घेता आलेले नाही. पंजशीरच्या काही भागात तालिबानी दहशतवादी शिरले होते. मात्र, पंजशीरच्या सैन्याने त्यांना हुसकावून लावले. तालिबान्यांकडून पंजशीरवर हल्ले करण्यात येत आहेत. मात्र, पंजशीर तालिबान्यांना जमानात नसून त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. कोणत्याही परिस्थितीत तालिबान्यांसमोर हार मानणार नसल्याचे पंजशीरने स्पष्ट केले आहे.
पंजशीरच्या नेशनल रेजिस्टेंट फ्रंटचे (एआऱएफ) नेतृत्व अहमद मसूद करत आहेत. त्यांनी तालिबानचे सरकार अमान्य असल्याचे म्हटले आहे. तालिबानने मंगळवारी आपली कॅबिनेट जाहीर केली. त्यानंतर त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तालिबान सरकार अवैध असून आम्ही आमचे समांतर सरकार चालवणार आहोत. तालिबान सरकार आम्ही मानत नाही, असे मसूद यांनी स्पष्ट केले. तसेच समांतर सरकारसाठी पंजशीरमधील नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.




























































