सोलापूर – उजनी धरणाने पाणीसाठय़ाची ‘सत्तरी’ ओलंडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडाभरापासून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाने पाणीसाठय़ाची ‘सत्तरी’ ओलांडली आहे.धरणात 70.43 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मध्यंतरी महिनाभर पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने सोलापूर, पुण्यासह नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयाचा पाणीसाठा 62 टक्क्यांच्या आसपास रेंगाळला होता. गेल्या काही दिवसांत या पाणीसाठय़ामध्ये वाढ होण्याऐवजी घट होऊन तो 60 टक्क्यांवर आला होता. परंतु गेल्या दोन-चार दिवसांपासून धरणसाखळी परिसर, भीमा खोरे, तसेच पुणे परिसरात होत असलेल्या पावसामुळे पुणे जिह्यातील पानशेत, चासकमान, पवना, डिंभे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. यामधून येणारे अतिरिक्त पाणी आता उजनी जलाशयात दाखल होत असल्याने जलाशयाच्या पाणीसाठय़ात वाढ होऊन तो सध्या 70.43 टक्क्यांपर्यंत गेला आहे.

सोलापूर जिह्यात पावसाचा जोर कमी असला, तरी पुणे जिह्यात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने त्याच्या बळावर निश्चितच उजनी धरण 100 टक्के भरेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोलापूर, पुणे, नगर या तिन्ही जिह्यांसह बार्शी, धाराशिव, लातूर, पंढरपूर, कुर्डूकाडी, करमाळा आदी मोठय़ा शहरांसह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना या उजनी जलाशयावरच अवलंबून असल्याने सर्वांच्या नजरा उजनी जलाशयाकडे लागल्या आहेत. दरवर्षी उजनी धरण 15 ऑगस्टच्या दरम्यान 100 टक्के क्षमतेने भरते; परंतु या वर्षी ऑगस्ट संपला तरी जलाशयाचा पाणीसाठा ‘शतका’पासून अद्यापि 32 पावले दूरच आहे.