अवघा कोळीवाडा मंचावर अवतरला, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अजरामर कोळीगीतांचा नजराणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाहीर विठ्ठल उमप म्हणजे महाराष्ट्राचा पहाडी आवाज. त्यांच्या जिवंत अभिनयाने सजलेले ‘जांभूळ आख्यान’ कधीच विसरता येणार नाही. विठ्ठल उमप यांनी भारुड, गोंधळ, पोवाडे अशा विविध लोकधारेने रसिकांची मनं जिंकली. त्यांची कोळीगीतेही खूप लोकप्रिय आहेत. याच कोळीगीतांवर आधारित  ‘ये दादा आवर ये’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे संदेश विठ्ठल उपम यांनी. नुकताच या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत ‘ये दादा आवर ये … कोळीगीतांच्या कोलीवाऱयात’ या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती  संदेश उमप यांची आहे. विठ्ठल उमप यांनी लिहिलेल्या व गायलेल्या अजरामर व पारंपरिक कोळीगीतांचा हा नजराणा आहे.  या कार्यक्रमात  प्रत्येक गीताची आठवण आणि त्यावरचा पारंपरिक नृत्याविष्कार सादर करण्यात  आला. जणू अवघा कोळीवाडाच रंगमंचावर अवतरला. प्रेक्षकांनीही कोळीगीतांच्या ठेक्यावर ताल धरला. ये दादा आवर ये, आज कोळीवाऱयात, फाटकी नोट मला घेवाची नाय, चिकना चिकना म्हावरा माझा,  काही नाई लई दे थोडी दे, देवाची किरपा आम्हावर, दादा मी दरिया बंगला बांधला, बांधले घुमते तुझं नाव काय, घे घालून अशी वेणीत गजरा, एकविरा आई माझे कोल्याचे माय…अशी एकापेक्षा एक सरस गीतं सादर झाली. ‘ये दादा आवर ये’ या कार्यक्रमाचे लेखन-दिग्दर्शन अशोक निकाळजे यांचे, तर निवेदन विकास समुद्रे यांचे आहे.