हार्दिक पटेलचा भाजपमध्ये प्रवेश, मोदींच्या नेतृत्वाखाली ‘लहान सैनिक’ बनून काम करण्याची प्रतिज्ञा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटीदार समाजाचे फायरब्रँड नेते हार्दिक पटेल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये हार्दिक पटेल यांनी पूजा केली. या पूजेनंतर बोलताना हार्दिक पटेल यांनी आज मी एक नवा अध्याय सुरू करत असल्याचे सांगितले. एक लहान सैनिक म्हणून मी काम करणार असून दर दहा दिवसांनी एक कार्यक्रम आयोजित करून काँग्रेसमधील नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन येई, असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक करत ते संपूर्ण जगाची शान असल्याचेही ते म्हणाले.

‘लहान सैनिक’ बनून काम करणार

राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणूनही काम करेन, असे ट्विट हार्दिक पटेल याने केले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. गुजरात निवडणुकांच्या तोंडावर हा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी आपल्या राजीनाम्याचं कारणही जाहीर केले होते. पाटीदार आरक्षण आंदोलनातून देशभर परिचित झालेल्या हार्दिक पटेल यांनी 2019 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना राज्य कार्यकारिणीत स्थानही देण्यात आले होते. मात्र, जेव्हा ते गुजरातचे प्रश्न घेऊन पक्षश्रेष्ठींकडे गेले, तेव्हा त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पटेल यांनी केला होता.

सकाळचा देशद्रोही, सायंकाळी भाजपमध्ये गेल्यास देशभक्त होतो! हार्दिक पटेलचे ट्विट व्हायरल

पटेल यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून पत्र लिहिले होते. त्यात काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती. केंद्र सरकारचा विरोध करण्यापलिकडे दिशादर्शक म्हणून काँग्रेसने काहीही केले नाही. त्यामुळे जनतेने काँग्रेसला नाकारल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं.

कोणत्याही गोष्टीबाबत गांभीर्याचा अभाव असल्याची टीकाही पटेल यांनी केली होती. गुजरातच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे, नेतृत्वाची गरज असताना विदेशात निघून जाणे, काँग्रेसमधील वरिष्ठ नेतृत्वाच्या मनात गुजरातविषयी असलेला तिरस्कार, अशी अनेक कारणं त्यांनी आपल्या पत्रात दिली होती.