सकाळचा देशद्रोही, सायंकाळी भाजपमध्ये गेल्यास देशभक्त होतो! हार्दिक पटेलचे ट्विट व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल याने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लहान सैनिक बनून काम करेन, असे म्हटले आहे. मात्र दुसरीकडे त्याचे जुने ट्विट आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांसह मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणूनही काम करेन, असे ट्विट हार्दिक पटेल याने केले आहे.

जुने ट्विट व्हायरल

एकीकडे हार्दिक पटेल आज भाजपमध्ये प्रवेश करणार असला तरी दुसरीकडे त्याचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. यात त्याने सकाळचा देशद्रोही, सायंकाळी भाजपमध्ये गेला तर तो देशभक्त होतो, असे म्हटले आहे. तर अन्य एका ट्विटमध्ये जनतेद्वारे निवडण्यात आलेले प्रतिनिधी जनतेशी द्रोह करून आपला स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलतात. तेव्हा अशा नेत्यांना भर चौकामध्ये उभे करून चपलांनी मारले पाहिले, असे म्हटले आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी

हार्दिक पटेलनं 18 मे रोजी गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा, तसेच प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमध्ये आपल्याला कोणतेही काम दिले नाही असे म्हणत त्याने राजीनामा दिला होता. तसेच माझ्या या निर्णयाचे लोक स्वागत करतील आणि आगामी काळात गुजरातसाठी सकारात्मक काम करू शकेन, असे त्याने म्हटले होते.