
आपल्या भारदस्त पण वेगळ्या शैलीतील आवाजात,‘ एक अकेला इस शहर में, दील धुंडता है फिर वही फुरसत के रात दिन, नाम गुम जाएगा, किसी नजर को तेरा इंतेजार आज भी हैं ..सारखी वेगळी गाणी गाऊन सिने रसिकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण करणार्या बॉलिवूड पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांचे सोमवारी सायंकाळी वयाच्या 82व्या वर्षी अंधेरीच्या क्रिटीकेअर रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
भूपिंदर सिंग यांची पत्नी मिताली यांनी भूपिंदर यांचे निधन झाल्याचे वृत्तसंस्थेला सांगितले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे मिताली यांनी सांगितले त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील असेही त्या म्हणाल्या. भूपिंदर सिंग यांचा जन्म 8 एप्रिल 1939 रोजी पंजाब प्रांतातील पटियाला येथे झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे पंजाबी शीख होते. ते खूप चांगले संगीतकार होते, पण अतिशय कडक शिस्तीचे संगीत मास्तर होते. वडिलांचा कडक स्वभाव पाहून भूपिंदरला सुरुवातीच्या काळात शास्त्रीय संगीताचा प्रचंड तिटकारा होता. एक काळ असा होता की, भूपिंदर यांना गायकी किंवा संगीत क्षेत्रात अजिबात रस नव्हता.
संगीतकार मदन मोहन यांनी संधी दिली
काही काळानंतर त्यांना गायकीत आवड निर्माण झाली आणि त्यांनी चांगल्या गायनाला सुरुवात केली. सत्तरच्या दशकात त्यांना प्रथम पंजाबच्या आकाशवाणी केंद्रावर गायनाची संधी मिळाली. त्याकाळात त्यानी गायलेल्या गझलांचे प्रक्षेपण आकाशवाणीवरून झाल्याने त्यांना दिल्लीच्या दूरदर्शनमध्ये संधी मिळाली. 1968 मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी त्यांचा ऑल इंडिया रेडिओवरील कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांना मुंबईला बोलावले. त्यांना पहिल्यांदा युद्धावरील ‘हकीकत’ चित्रपटात संधी मिळाली, जिथे त्यांनी ‘होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा’ हे गीत गायले. त्यानंतर त्यांनी समांतर चित्रपटांच्या काळात गझलही गायल्या. त्यांनी मौसम, सत्ते पे सत्ते, आहिस्ता आहिस्ता, दूरियां, हकीकत अशा चित्रपटांमधील त्यांच्या वेगळ्या शैलीतील गाण्यांसाठी लक्षात ठेवले जाते. होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा, दिल धुंडता फिर वही फुरसत के रात दिन, दुकी पे दुकी हो या सत्ते पे सत्ता..या गाण्यांनी त्यांना व्यावसायिक यश मिळाले.


























































