
भाजपला यापुढे लोकसभेत बहुमत मिळणार नाही. देशातील जनताच भाजपला 2024 मध्ये केंद्रातील सत्तेतून पायउतार करेल, असा दावा तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला. भाजप राज्य सरकारे तोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. शहीद दिनाच्या निमित्ताने कोलकाता येथे आयोजित टीएमसीच्या रॅलीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ात ज्यांची कसलीही भूमिका नव्हती, आज ते देशाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, 2024 मध्ये भाजपला देशाच्या सत्तेपासून दूर ठेवले जाईल. जनताच त्यांना स्वबळावर सत्ता मिळू देणार नाही, असा ठाम दावा करतानाच ममता बॅनर्जी यांनी जनतेचे सरकार आणा आणि भाजपच्या पैदेतून मुक्त व्हा, असे आवाहन केले.
अन्नधान्य, डाळ आणि पिठासारख्या खाद्यपदार्थांच्या 25 किलोग्रॅमपेक्षा कमीच्या पॅकेट्सवर जीएसटी लावण्याचा केंद्राचा निर्णय जनविरोधी आहे. आम्ही मेलो तर मृतदेह वाहून नेण्यासाठी आणि बेडवर किती जीएसटी लागेल, असा प्रश्न करत ममता बॅनर्जी यांनी भाजपचा मेंदू निकामी झालाय, अशा शब्दांत जीएसटी वाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
बंगाल तोडण्याची हिंमत करू नका
महाराष्ट्रानंतर बंगालला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही रॉयल बंगालचा वाघ पाहिला आहे का? बंगाल तोडण्याची हिंमत करू नका. रॉयल बंगाल टायगर इथे राहतो. खूप सावध राहा, असा सूचक इशारा ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिला.






















































