ओमायक्रोनच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव, दिवाळीच्या तोंडावर राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या तोंडावर राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 17.7 टक्क्यांनी वाढ झाली असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

ओमायक्रोनचा सब व्हेरिएंट ‘एक्सबीबी’ने हिंदुस्थानात आधीच शिरकाव केला आहे. केरळसह देशातील काही राज्यांत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही नव्याने आढळणाऱया रुग्णांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणे दिसून येत आहेत. त्यातच पुणे येथे ओमायक्रोनच्या आणखी दोन नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. सोमवारी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल आले असून त्यात ओमायक्रोन बीए.2.3.20 आणि बीक्यू.1 या दोन नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून देशातील या व्हेरिएंटचे हे पहिलेच रुग्ण ठरले आहेत.

‘एक्सबीबी’चा धोका अधिक

बीए.2.75 या व्हेरिएंटच्या तुलनेत ‘एक्सबीबी’ व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्याचे आढळून आले असून राज्याच्या आरोग्य विभागाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात नव्या व्हेरिएंटने शिरकाव केल्याने त्याबाबतही खबरदारी घेण्यात येत आहे.

आरोग्य विभागाने काय सांगितले?

 ठाणे, रायगड, मुंबई या भागांमध्ये कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
 3 ते 6 ऑक्टोबर या आठवडय़ाच्या तुलनेत 10 ते 16 ऑक्टोबर या आठवडय़ात रुग्णसंख्येत 17.7 टक्के वाढ दिसून आली.
 पुण्यातील रुग्णाच्या नमुन्यांत सोमवारी ओमायक्रोन बीक्यू.1 या व्हेरिएंटची लक्षणे आढळली. हा या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण ठरला.
 सणासुदीचे दिवस आहेत. त्यात थंडीचा मोसमही जवळ येत आहे. या कालावधीत कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे.
 तापाची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.