भाजपमधील अंतर्गत वादातून उडगीत कर्नाटकचे झेंडे फडकले! अक्कलकोटमध्ये भाजप आमदाराविरोधात उद्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कलकोट तालुक्यातील सीमाभागातील उडगी गावात कर्नाटकचे झेंडे फडकवून काही हुल्लडबाजांकडून आंदोलन सुरू आहे. सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकोटचे आमदार यांच्याविरुद्धचा उद्रेक आणि भाजपअंतर्गत वादातून हा भयंकर प्रकार घडत असल्याची संतप्त भावना येथील नागरिकांमध्ये आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सीमाभागातील प्रश्न पेटला आहे. याचा फायदा घेत सीमावर्ती भागातील काही लोकांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहेत. यातूनच अक्कलकोट तालुक्यातील उडगी गावात आज कर्नाटकचे झेंडे फडकवीत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाच्या पाठीमागे सीमावादापेक्षा गेल्या काही वर्षांपासून गावाच्या विकासाकडे झालेले दुर्लक्ष आणि कल्याणशेट्टी यांची पक्षपाती मनोवृत्ती असल्याची चर्चा आहे. उडगी, बासले गाव, नागनहळ्ळी यांसह अनेक गावे सीमेला लागून आहेत. अनेक वर्षांपासून या गावांत रस्ते, वीज, पाणी यांसारखे मूलभूत प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी सोडवू शकले नाहीत. कल्याणशेट्टी विशिष्ट भागातच निधीवाटप करीत असल्याने सीमावर्ती भागातील ग्रामस्थांमध्ये सुविधांबाबत उद्रेक होत आहे. अक्कलकोट तालुक्यात भाजपमध्ये उभी फूट पडली असून, सीमावादाच्या या आंदोलनाला काही नाराज पदाधिकाऱयांचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडकीस आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटकसमर्थनाच्या या आंदोलनाचा भाजपचे आमदार कल्याणशेट्टी यांची पक्षपाती भूमिकाच कारणीभूत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

लोकांची डोकी भडकवाल तर गुन्हा दाखल करू!

अक्कलकोट तालुक्यात सीमावादावरून लोकांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोटचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी हुल्लडबाजी करून आंदोलन करणाऱ्यां तथाकथित पुढारी आणि नागरिकांना गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ‘‘परवानगीशिवाय आंदोलन करून लोकांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करू,’’ अशा इशारा दिला आहे.