
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे जिवंत सरकार नसून केंद्रातील महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकून महाराष्ट्रात हे सरकार बनवले आहे. पैशांचा वारेमाप वापर करून हे घटनाबाह्य सरकार आले आहे, अशी टीका करतानाच शिंदे-फडणवीस सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला. शिंदे गटाला वाटते की, त्यांच्याकडे महाशक्ती असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असे संजय राऊत म्हणाले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे थंडी लागू नये म्हणून भारत जोडो यात्रेदरम्यान थर्मल शर्ट घालतात, अशी टीका भाजपाने केली होती. त्याबद्दल प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रेमाचा संदेश देण्यासाठी राहुल गांधी एखाद्या तपस्वीप्रमाणे भारत जोडो यात्रा करत आहेत. मात्र भाजप नेते कपडे, खाण्या-पिण्यावरून देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत.
पहिल्याच दिवशी निकाल लागला असता
मुळात राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या पहिल्याच दिवशी निकाल लागू शकला असता. घटनाबाह्य सरकारला रोखणे हे न्यायालयाचे कामच आहे. राज्यात हे घटनाबाह्य सरकार जे निर्णय घेत आहे, भ्रष्टाचार करत आहे, ते सर्व राज्यच काय, देशाच्याही हिताचे नाही, असे संजय राऊत म्हणाले.
कानामधले बोळे काढा
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कानामधले बोळे काढून नीट कान साफ करून ऐका. नाहीत कानकोरणे पाठवतो. मी सत्तासंघर्षावर फेब्रुवारीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू शकतो, असे म्हटले होते आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील शिंदे सरकार पडणारच आहे.


























































