बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; राधानगरी, भुदरगड तालुक्यांत कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे आणि भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द येथे बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आरोग्य विभाग आणि पोलीस पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, सोनोग्राफी मशीन आणि रोखरकमेसह तब्बल 5 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे धाड टाकून श्रीमंत तानाजी पाटील (रा. परिते, ता. करवीर) यास गर्भलिंग निदान तपासणी करताना पोलिसांनी अटक केली. पाटील याचा मदतनीस दत्तात्रय कृष्णात पाटील (रा. सिरसे, ता. राधानगरी), सुनील रामचंद्र ढेरे (रा. आ. व्हरवडे, ता. राधानगरी), विजय लक्ष्मण कोळस्कर (रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गर्भलिंग निदान चाचणीकरिता वापरण्यात येणारे सोनोग्राफी मशीन व रोख 2,06,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठिकपुर्ली ते माजगावदरम्यान ओढ्याजवळ आरोपी श्रीमंत पाटील गर्भलिंग चाचणी करायचा व दत्तात्रय पाटील व ढेरे हे त्याचे एजंट आहेत.

राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे व भुदरगड तालुक्यात मडिलगे खुर्द येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथकासह व जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलेल्या विजय लक्ष्मण कोळस्कर याच्या घरातील सोनोग्राफी मशीनसह 2,77,247 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य पथक व जिल्हा पोलीस पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मडिलगे खुर्द येथे विजय लक्ष्मण कोळस्कर याच्याकडे गर्भलिंग तपासणीसाठी एका महिलेला पाठवण्यात आले. यावेळी त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. कोळस्कर याच्यावर जिल्हा आरोग्य पथकातील गौरी पाटील, गारगोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक प्रिया पाटील पथक व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली.