
मुलीच्या साखरपुड्यासाठी घर बंद करून गेल्यानंतर भावाच्या मेव्हण्याने घरातील मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 3 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज पळून नेल्याची घटना चाकूर तालुक्यातील मौजे रायवाडी येथे घडली. या चोरी प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबुराव पाटलोबा मुरकुटे रा. रायवाडी ता. चाकूर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 24 जानेवारी रोजी त्यांच्या मुलीचा साखरपुडा परळी तालुक्यातील मौजे टोकवाडी येथे होता. साखरपुड्यासाठी घरातील सर्वजण गेले होते. साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून सायंकाळी सहा वाजता सर्वजण घरी परत आल्यावर घराच्या दाराचे कुलूप कोंडा तोडलेला आढळून आला. कपटात ठेवलेले रोख 2 लाख 98 हजार रुपये आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेले चार ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स असा 3 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
फिर्यादीने गच्चीवर जाऊन पाहिले असता घराच्या गच्चीवरचा दरवाजा उघडा होता. त्यांच्या भावाच्या घरातून फिर्यादीच्या गच्चीवर सहज येणे शक्य होते. भावाच्या घरी त्यांचा मेहुणा सोमनाथ बाबुराव मुंडे रा. लिंबूवाडी ता. चाकूर हा होता. त्यांनीच चोरी केली म्हणून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे


























































