शेतकर्‍यांवर लाठी चालवणार्‍या शिंदे-फडणवीसांच्या उमेदवारांवर बहिष्कार, सेनगाव तालुक्यातील दोन गावांच्या ग्रामस्थांनी शपथ घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर लाठी चालवणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सेनगाव तालुक्यातील वरखेडा व कहाकर या गावातील शेतकर्‍यांनी चावडीवर एकत्र येत आगामी निवडणुकीत शिंदे-फडणवीसांच्या उमेदवारांवर सामूहिक बहिष्कार घालण्याची शपथच घेतली आहे.

बुलढाणा येथे शेतमालाला हमीभाव मिळावा, पीक विम्याचे अनुदान मिळाले आदी शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर शिंदे-फडणवीस सरकारने लाठीहल्ला केला. गोरगरीब शेतकर्‍यांना बेदम झोडपून काढले. सरकारच्या या हुकूमशाहीविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे. गोरेगाव येथे शेतकर्‍यांनी सोयाबीन, कापूस जाळून शिंदे-फडणवीस सरकारच्या नावाने शिमगा केला. दुसरीकडे तालुक्यातीलच वरखेडा व कहाकर या दोन गावांतील शेतकर्‍यांनी चावडीवर एकत्र येऊन आगामी निवडणुकीत शिंदे-फडणवीस गटाच्या उमेदवारांवर सामूहिक बहिष्कार घालण्याची शपथच घेतली. यावेळी सरपंच गजानन सावंत, बळीराम सावंत, लक्ष्मण शिंदे, उत्तमराव शिंदे, सुदाम बनसोडे, पांडुरंग सावंत, गजानन कावरखे, नामदेव पतंगे व शेकडो शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

शिंदे-फडणवीस सरकार शेतकर्‍यांचा कळवळा असल्याचे दाखवते. परंतु परिस्थिती मात्र नेमकी उलट आहे. हिंगोलीसह मराठवाड्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. सोयाबीन, हळद, कापसाला भावच नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. न्यायासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले तर त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जात आहेत.