
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी 12 तुघलक लेन येथील त्यांचा सरकारी बंगला पूर्णपणे रिकामा केला. बंगला रिकामा केल्यानंतर त्यांनी त्याची चावी लोकसभा सचिवालयाकडे सोपवली. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल यांना लोकसभा सचिवालयाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार आज बंगला रिकामा करण्याचा शेवटचा दिवस होता. आज बंगल्यातील वस्तूंनी भरलेले ट्रक बाहेर निघताना दिसले. सरकारी निवासस्थान रिकामे केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, “हे घर मला देशातील जनतेने 19 वर्षे दिले. आज मी ते रिकामे करत आहे. मला जनतेचे आभार मानायचे आहेत. मी सत्य बोलण्याची किंमत चुकवत आहे. मात्र कुणीतरी खरं बोलायला हवं, आणि मी ते बोलतोय.”






















































