
>> डॉ. प्राची मोघे
अभिजात संस्कृत साहित्यकारांचा प्रथम साहित्यकार म्हणजे अश्वघोष. ‘बुद्धचरिता’सारखे महाकाव्य आणि ‘सौन्दरानन्द’सारखे नाटक या दोन कलाकृतींवरून लक्षात येते की, अश्वघोषाची लेखणी पद्य आणि गद्य या दोहोत निष्णात चालत होती.
अश्वघोष हा एक कनिष्काच्या काळातील इ.स. पहिल्या शतकातला महाकवी, बौद्ध तत्त्वज्ञ होऊन गेला. कालिदासपूर्व काळातील तो एक महान कवी होता. ‘बुद्धचरित’ हे गौतम बुद्धाच्या जीवनावर अश्वघोषाने रचलेले महाकाव्य सुपरिचित आहे. अभिजात संस्कृत साहित्यकारांचा प्रथम साहित्यकार म्हणजे अश्वघोष. ‘बुद्धचरिता’सारखे महाकाव्य आणि ‘सौन्दरानन्द’सारखे नाटक या दोन कलाकृतींवरून लक्षात येते की, अश्वघोषाची लेखणी पद्य आणि गद्य या दोहोत निष्णात चालत होती. महायान पंथाचा मोठा तत्त्वज्ञ असूनही त्याची साहित्यिक प्रतिभा अलौकिक होती. प्रभावी वक्ता असलेल्या अश्वघोषाने ‘महायान श्रद्धोत्पादनशास्त्र’ आणि ‘सूत्रालंकार’ हे ग्रंथ लिहिले. या लेखात आपण ‘बुद्धचरित’ या त्याच्या काव्याचा मागोवा घेणार आहोत.
प्रारंभिक इतिहासकाळात सम्राट अशोकाने केलेला धम्मविजय, शृंग, सातवाहन यांचे उदारमतवादी धोरण आणि कुशाण राजा कनिष्काने स्वीकारलेला बौद्ध धर्म आणि महायान पंथाचा उदय आणि भरभराट या पार्श्वभूमीवर बौद्ध धर्म, गौतम बुद्धाचे जीवन याबद्दल एक आत्मीयता वाढीस लागली होती. सर्वसामान्यांना गौतम बुद्धाचे जीवन अवलोकित करता यावे यासाठी अश्वघोषाने अतिशय मधुर, काव्यशास्त्राचे रिवाज पाळून, तरीही मनोरम, काव्यसौंदर्याने परिप्लृत असे महाकाव्य लिहिले. या काव्याचा गाभा शांत रस आहे. राजपुत्र सिद्धार्थ सत्याच्या शोधार्थ प्रियजनांचा त्याग करून राजवाडा सोडतो. रानावनात अपार कष्ट घेत तपसाधना करतो. वाचकाला सातव्या सर्गातील तपोभूमीचे सुंदर वर्णन शांत रसाने भारून टाकते.
महाकाव्य असल्याने शृंगार रसही हवाच. ‘बुद्धचरिता’च्या दुसऱया, चौथ्या आणि पाचव्या सर्गात शृंगार रस आढळतो. गौतम बुद्ध आणि यशोधरा यातील संवाद, त्यांचे तरल नाते, राहुलचा जन्म असे काही प्रसंग आहेत, ज्यात शृंगार रसाचा परिपोष झाला आहे. खरंतर संस्कृत महाकाव्याच्या मापदंडानुसार शृंगार रस प्रधान असला पाहिजे, परंतु या काव्यात शांत रस प्रधान आहे. वैदर्भी रीतीत रचलेले हे महाकाव्य अतिशय लोकप्रिय आहे.
एखाद्या रचनेचे साहित्यिक मूल्य महत्त्वाचे आहेच, पण त्यातून प्रतिबिंबित होणाऱया समाज दर्शनामुळे सांस्कृतिक अध्ययन जास्त महत्त्वाचे ठरते. म्हणूनच साहित्याला समाजाचा आरसा म्हटले जाते. ‘बुद्धचरिता’त राजवाडय़ातील विलासी जीवनाचे मनोरम दर्शन घडते. यातील काही काव्यपंक्ती एखाद्या सुंदर शिल्पाचे मूर्तिमंत वर्णन करतात. अश्वघोषाच्या काळात स्त्रियांची सामाजिक स्थिती उच्च दर्जाची होती. बौद्ध संस्कृतीत स्त्रियांना समानतेची वागणूक मिळत असे, असे म्हटले जाते. ‘बुद्धचरिता’त सिद्धार्थ – यशोधरेचा विवाह आणि राहुलचा जन्म यामुळे राजा शुद्धोदनाच्या आनंदाला पारावार उरला नाही असे वर्णन आहे. विवाह संस्था, त्याचे पवित्र, अतूट बंधन, विवाहाची परिणती पुत्रजन्म याचे अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते.
सिद्धार्थाची माता मायादेवी आणि पत्नी यशोधरा या आदर्श हिंदुस्थानी नारीच जणू. प्रेम, ममता, वात्सल्य, संगोपन, कणखरपणा, नैतिकता, कर्तव्यतत्परता, क्षमाशीलता, सर्वांगीण काळजी घेणे असे अनेक गुण, ज्यांना खास स्त्रियांची गुणवैशिष्टय़े मानली जातात, त्या गुणांचे भांडार म्हणजे या राजघराण्यातील स्त्री व्यक्तिरेखा. यशोधरा अत्यंत रूपमती, स्निगूध, नम्र, गुणवती. स्त्राr साक्षात ’श्री’चेच म्हणजे भाग्यलक्ष्मीचे रूप. राजघराण्यातील इतर स्त्रियाही प्रेमळ, कुशल होत्या.
यशोधरेच्या सख्यांचे चित्रणही मनोज्ञ आहे. सिद्धार्थ जीवनातील सत्यांना सामोरे जाण्यापूर्वी राजवाडय़ात विलासात रममाण होत असे तेव्हाचे वर्णन करताना कवी त्या विलासी, तरुण रूपयौवना स्त्रियांचे चित्रण करताना त्यांचे अंग-प्रत्यंग दर्शविणारी वस्त्रs, अलंकार, त्यांचे विविध विभ्रम, मदमस्त आवाज, मादक हालचाल आणि राजपुत्राबरोबरचे विलासी वर्णन करतो. वैशालीची नगरवधू आम्रपाली हिचाही उल्लेख येतो. पुढे ती गौतम बुद्धाला भेटते आणि या मोहपाशातून मुक्त होते हाही प्रसंग छान आलाय. राजपुत्राच्या मनोरंजनासाठी अनेक कलावंत स्त्रियांची नेमणूक केली जायची. वीणा वादन, बासरी वादन, तालवाद्ये वाजविणाऱ्या स्त्रियांची वर्णने येतात.
पाचव्या सर्गात अश्वघोषाने स्त्राr सौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. राजवाडय़ातील स्त्रिया विविध दागिन्यांनी मढलेल्या असत. माला, हार, योपक म्हणजे कंठसूत्र, सुवर्णसूत्र, कुंडल, मणिकौंडल, नूपुर, केयूर, भूजपाश, वलय, अंगद, मेखला अशा विविध अलंकारांचा उल्लेख आला आहे. श्रीमंत स्त्रिया सोन्याचांदीचे दागिने मढवत तर सामान्य स्त्रिया परवडतील अशा वस्तूंचे दागिने घालत. नंदबाला या गोपकन्येने पांढऱया शंखांचे दागिने घातल्याचे वर्णन येते. राजवाडय़ातील स्त्राr-पुरूषच नव्हे तर प्राणीही मुख्यत: अश्व, गज सोन्याचांदीच्या अलंकारांनी सजत असत. सिद्धार्थचा प्रिय घोडा कंठक सुवर्णघंटा, सुवर्ण वाजी, लगाम यांनी सजला होता. एकंदरीतच दागिन्यांचा सोस होता हे लक्षात येते.
‘बुद्धचरिता’त समाजातील श्रीमंत, सामान्य जन तसेच बौद्ध भिक्खूंचे वर्णन येते. त्यांची वस्त्रप्रावरणांसाठी वस, वेस, वस्त्र असे शब्द योजिले आहेत. स्त्रियांच्या वस्त्रांना अंशुक असे म्हणत. राजघराण्यातील लोक रत्नजडित तलम वस्त्रs परिधान करीत तर सर्वसामान्यांचे वेष साधेसुधे असत. गोपकन्या नंदबालेचे गडद निळय़ा रंगाचे, जाडेभरडे होते. हिवाळ्यात लोकरी कपडे घालत असत. सिद्धार्थने तपोवनात प्रवेश करते वेळी राजवस्त्रs त्यागून कषाय वस्त्रs परिधान केली.
वेशभूषेबरोबरच रंगभूषेचाही उल्लेख येतो. त्या काळी स्त्राr-पुरुष दोघेही सौंदर्यप्रसाधने वापरत असत. स्त्रिया आर्द्रानुलेपन हे अंगविलेपन म्हणजेच बॉडी लोशन वापरत असत, जे आर्द्र आणि पिवळय़ा रंगाचे असे. स्तन चंदनाच्या पेस्टने सुशोभित करीत तर डोळय़ात अंजन घालत असत. फुलांच्या मालाही धारण करत असत. संगीत, शिकार आणि नाटक ही मनोरंजनाची साधने होती. अश्वघोष स्वत: उत्तम संगीतकार होता. त्याने गायन आणि वादन, दोन्ही संगीत कलांचा उल्लेख केला आहे.
राजवाडय़ातील स्त्रिया संगीत कलेत प्रवीण होत्या. विविध वाद्यांवर त्यांची बोटे नजाकतीने फिरायची, त्यात कलात्मकता होती. पणव, तूर्या, दुंदुभी यांसारखी घोषवाद्ये तसेच परिवादिनी म्हणजे मोठी वीणा या वाद्यांचा उल्लेख आढळतो. राजपुरुषांचा आवडता खेळ म्हणजे शिकार, पण सिद्धार्थला मात्र शिकारीचे वावडे. कुठल्याही प्राण्याचा उगाच जीव घेणे त्याला नकोसे होई. नृत्य, नाटय़ याही महत्त्वाच्या कला होत. एकंदरीतच ‘बुद्धचरिता’तील सिद्धार्थ तपोवनात जाण्यापूर्वीचे राजवाडय़ातील विलासी जीवनाचे छान वर्णन केले आहे. त्यावरून तत्कालीन समाज जीवन दिसून येते.
– [email protected]
(लेखिका पुरातत्वशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)































































