
>>अश्विन बापट
दोन भाऊ. दोघंही एमबीए. आघाडीच्या बँकांमध्ये घसघशीत पगाराची नोकरी. वडील, आजोबा शेतीमध्ये असल्याने त्यांचं मन मात्र रमत नव्हतं. मग त्यांनी बक्कळ पगाराची नोकरी सोडली आणि धरली सेंद्रिय शेतीची वाट. ही थक्क करणारी गोष्ट आहे इंदापूरच्या भोडणी गावातील सत्यजित आणि अजिंक्य या हांगे बंधूंची.
अजिंक्य त्यांच्या वाटचालीविषयी म्हणाले, आमचं मन नोकरीत रमत नव्हतं. शेतीतली हिरवळ, निसर्गातला मोकळेपणा आम्हाला खुणावत होता. मग आम्ही दोघांनीही बँकेच्या नोकरीला रामराम केला आणि 2012 पासून या सेंद्रिय शेतीची वाट धरली. ऊस, तसंच फळबागांपासून आम्ही सुरुवात केली. शेवगा, डाळिंबं, लिंब, सीताफळ अशी विविध 25 पिकं आम्ही घेतो. आम्ही त्या काळात 4 गायींपासून सुरुवात केली, आज आमच्याकडे दीडशे गीर गायी आहेत. आमचं मुख्य आणि लोकांमध्ये सर्वात हवंहवंसं उत्पादन म्हणजे तूप. याकरता आमची आई पहाटेलाच उठून तूप बनवण्यासाठीच्या प्रक्रियेत आवर्जून लक्ष घालते. याशिवाय गुलपंद, स्वयंपाकाचं तेल, पीनट बटर, खपली गव्हाचं पीठ, लिंबाचं किंवा पैरीचं लोणचं, च्यवनप्राश, अमलाप्राश, गूळ पावडर, अशी आमची उत्पादनं ग्राहकांच्या पसंतीला उतरलीत. आमच्याकडील गायींच्या बाबतीत विशेष सांगायचं म्हणजे, आम्ही त्यांना ताक प्यायला देतो. ज्यामुळे चाऱयाचा खर्च बऱयापैकी वाचतो.
अडीचशे जणांना रोजगार
आज हांगे बंधूंची वार्षिक उलाढाल 45 कोटींहून अधिक आहे. त्यांच्याकडे अंदाजे 250 जण काम करतात. आमची उत्पादनं सुमारे 50 देशांमधील 1,200 शहरांमध्ये जातात. Twobrothedersorganicedfarmeds या कंपनीच्या वेबसाईटवर त्यांची उत्पादने आहेत.
कॉन्ट्रक्ट फार्मिंग संकल्पना
हांगे बंधू शेणखत आणि गोमूत्राचा वापर करूनच शेती करतात. कॉन्ट्रक्ट फार्मिंग संकल्पनेनुसार, महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील सेंद्रिय शेती करणाऱया शेतकऱयांनाही उत्पादन वाढीसाठी किंवा कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी सहाय्य करतात. कर्नाटकातील अनेक शेतकऱयांना ही सेवा देत आहेत. पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकचा वापर न करणं, विजेसाठी सोलर पॅनल तसंच दूध वितरणासाठी ईव्हीचा उपयोग करणे, पावलं त्यांनी उचलली आहेत.
लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.


























































