
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना नववर्षाची भेट दिली आहे. एसबीआयने एफडीवर व्याजदरात 50 बेसिक पॉइंटपर्यंत वाढ केली आहे. बँकेने एक ते दोन वर्षांपेक्षा कमी, दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी आणि पाच ते दहा वर्षे वगळता सर्व कालावधींसाठी व्याजदर वाढवले आहेत. नवीन व्याजदर 27 डिसेंबरपासून लागू होतील.
असे असतील नवे दर
एसबीआयने सात दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 50 बेसिस पॉइंट वाढवून 3.50 टक्के, 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 25 बेसिस पॉइंट वाढवून 4.75 टक्के, 180 ते 210 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंटची वाढ करून 5.75 टक्के, 211 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची वाढ करून सहा टक्के आणि तीन वर्षांपासून पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 25 बेसिस पॉइंटची वाढ करून व्याजदर 6.75 टक्के केले आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत सात दिवस ते दहा वर्षांच्या एफडीसाठी चार टक्के ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येईल.




























































