
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने बिबवेवाडी व कात्रज परिसरात धडक कारवाई करून 5 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही ठिकाणाहून पथकाने अवैध गोवानिर्मित 1 हजार 200 बाटल्यांचे 53 बॉक्स, एक दुचाकी वाहन जप्त केले आहे. उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत यांनी ही माहिती दिली. यावेळी निरीक्षक अशोक कटकम, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे आदी उपस्थित होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी शहर परिसरात हॉटेल, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा वापर होतो. यातच अवैधरित्या राज्यात विक्रीसाठी बंदी असलेली गोवानिर्मित दारू छुप्या पद्धतीने अवैधरित्या शहरात आणली जाते. यावर कारवाईसाठी पुण्यात उत्पादन शुल्क विभागाने सतरा पथके तैनात केली आहेत. यामाध्यमातून शहर परिसर तसेच महामार्गावर गस्त वाढविण्यात आली आहे. गुरुवारी (दि.28) रात्री उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत असतानाच अप्पर बिबवेवाडी भागात एकजण दुचाकीवरून अवैधरित्या दारू वाहतूक करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून संबंधीत व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 96 सीलबंद दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याबाबत त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याच्यासह साथीदारांकडून बिबवेवाडी – कात्रज भागातून विविध कंपनीचे तब्बल 53 बॉक्स जप्त केले. तर, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभाग पुणेचे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उप अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ मरकड, प्रियंका राठोड, राहुल खाडगीर, राजेश पाटील, जवान विशाल गाडेकर, माधव गाडे आदींनी ही कारवाई केली.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर पसिरातील पार्ट्यांवर उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे. अवैधरित्या दारू वाहतूक, विक्री रोखण्यासाठी पथके तयार केली असून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली आहे.
– चरणसिंह रजपूत, अधिक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे.


























































