
महापालिका क्षेत्रातील फुकट पाणी वापर बंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 115 सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या या निर्णयास झोपडपट्टीधारकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
सांगली महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक कनेक्शनच्या सर्वेक्षणात सार्वजनिक नळावरील पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे यावर सूचना व हरकती मागून अंतिम निर्णय घेणार असल्याचे आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केले. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक नळ कनेक्शन सर्व्हे केल्यानंतर या पाण्याचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर आणि अपव्यय होत असल्याचे दिसून आले. नळाचे पाणी व्यवसायासाठी, गाडय़ा धुण्यासाठी वापरले जात आहे. हातगाडे, छोटे चहाचे स्टॉल्स आदी विक्रेते याच स्टॅन्ड पोस्टच्या पाण्याचा वापर करताना आढळून आले. या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती एक ते चारमधील सर्व नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय महापालिकाने घेतला आहे. त्यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. सूचना व हरकती 8 जानेवारीपर्यंत मंगलधाममधील महापालिका इमारतीत नोंदवाव्यात, असे आवाहन कार्यकारी अभियंता सी. एस. कुरणे यांनी केले आहे.
महापालिकेने यापूर्वी अनेकदा सार्वजनिक नळ बंद करण्याबाबत निर्णय घेतला. मात्र, अनेक नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवला होता. त्यांच्या प्रभागातील झोपडपट्टय़ांतील गोरगरिबांना लाभ होत असल्याने नगरसेवकांनी सभागृहात या विषयास तीव्र विरोध केला होता. त्यामुळे निर्णय बारगळला. आता कारभाराच्या सर्व दोऱया प्रशासक या नात्याने आयुक्तांकडे असल्याने त्यांनी ठामपणे हे नळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

























































