
काहींच्या मनात अजूनही प्रश्न आहे की, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आहे, पण पर्याय कुठे आहे? हुकूमशाहीला पर्याय नसतोच. ती उखडून फेकणे हाच पर्याय असतो, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला.
पैठण, वैजापूर, छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. कोरोना काळात आपण ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवली होती. आता महाराष्ट्रावर आणि देशावर आलेल्या दुसऱया संकटात माझे कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी महाराष्ट्रात फिरतोय, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी नुकत्याच केलेल्या कोकण दौऱयाचाही दाखला दिला. ते म्हणाले की, नुकताच आपण महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा दौरा केला. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर काही काळापूर्वी ‘निसर्ग’ आणि ‘तौक्ते’ अशी दोन चक्रीवादळे आदळली होती, पण गेल्या चार दिवसांत दिसले की, एक वेगळे भगवे वादळ आता दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे आणि हुकूमशाहीची चिरफाड करणार आहे.
भाजपमधील लोक शिवसेनेत येत आहेत, मुस्लिम समाज मोठय़ा संख्येने शिवसेनेत येतोय असा अनुभव प्रत्येक दौऱयात येत आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षांत भाजपने केलेला ओंगळवाणा कारभार आता उघडा पडला आहे, अशी टीका केली. ते पुढे म्हणाले की, गावागावांमध्ये लोक मोदी सरकारचा रथ अडवून जाब विचारत आहेत. कारण तिथे योजनाच पोहोचलेली नाही. अशा या खोटय़ा कारभाराला संपवण्यासाठी तुम्ही शिवसेनेत आलात. संकटकाळात महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो तसाच सध्याच्या संकटातही महाराष्ट्र देशाची दिशा ठरेल आणि हुकूमशाहीला गाडेल अशी मला खात्री आहे.
पैठण, वैजापूर, छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत
‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पैठण मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 2019 च्या निवडणुकीत दुसऱया क्रमांकावर राहिलेले उमेदवार व माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, वैजापूर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. राजू डोंगरे आणि छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.


























































