अयातुल्ला अली खामणी यांची पत्नी जिवंत, निधनाच्या बातम्या अफवा असल्याचे इराणी मीडियाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पत्नी मन्सुरेह खोजास्ते यांच्या निधनाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये फिरत होत्या. मात्र आता इराणच्या अधिकृत मीडियाने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या असून मन्सुरेह खोजास्ते जिवंत असल्याचा दावा केला आहे.

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धाच्या सुरुवातीला झालेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी मन्सुरेह देखील जखमी झाल्या असून त्यांचा मृत्यू झाल्याचा, दावा काही सरकारी आणि खाजगी मीडिया आउटलेट्सने केला होता. मात्र इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी (IRGC) संबंधित फार्स न्यूजने गुरुवारी या वृत्ताचे खंडन केले.

दरम्यान, खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मोजतबा यांनी गुरुवारी आपले पहिले अधिकृत विधान प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या मृत्यूचा कोणताही उल्लेख केला नाही. या विधानानंतरच त्यांच्या आईच्या जिवंत असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.