दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जय अंबेला जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडलेल्या एलआयसी पुरस्कृत आंतर मुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जय अंबे संघाने थरारक विजयासह जेतेपद पटकावले. स्पर्धेत ठाणे इलेव्हन, बोरिवली इलेव्हन, जय अंबे, पालघर इलेव्हन, नवी मुंबई आणि कुलाबा इलेव्हन या सहा संघांनी सहभाग घेतला.

अंतिम सामन्यात ठाणे इलेव्हनने प्रथम फलंदाजी करत 127 धावा उभारल्या. प्रत्युत्तरादाखल जय अंबेने धडाकेबाज खेळ करत लक्ष्य गाठत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत प्रसाद चव्हाणला (ठाणे)  मालिकावीर व सामनावीर, तर विजय सरोजला (जय अंबे) उत्कृष्ट फलंदाज, अजय म्हात्रेला (जय अंबे) उत्कृष्ट गोलंदाज, तर दयानंदला (ठाणे) उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण अनिल जोगळेकर, रेखा वाडेकर, विजय येवलेकर, महेश शेटये, दिनेश पाटील, प्रीती पोतदार, भाग्यश्री वर्तक, अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी पुरुषोत्तम जाधव, सूर्यकांत लाडे, विलास मोरे, मोहन पाटील, रवी पडवळ, बाबाराव धोत्रे, राजन भरताव, सचिन गायकवाड, राजेश सुर्वे उपस्थित होते.