इराण युद्धाचा परिणाम! ट्रम्पने अचानक चीन दौरा पुढे ढकलला, जागतिक राजकारणात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा महत्त्वाचा बीजिंग दौरा अचानक पुढे ढकलला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे समोर आले आहे. याआधी हा दौरा मार्चअखेरीस होणार होता. परंतु आता हा दौरा पुन्हा एक ते दीड महिन्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांच्यासोबत व्यापार, तंत्रज्ञान आणि तैवानसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार होती.

इराणमधील संघर्षामुळे अमेरिकेचे लक्ष पूर्णपणे मध्यपूर्वेकडे वळले आहे. होर्मूज सामुद्रधुनीतील तणावामुळे तेल पुरवठा आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे चीनसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न सध्या थांबला आहे. हा दौरा अमेरिका-चीन संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील चर्चा आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे.

ट्रम्प यांनी अलीकडेच इराणी हल्ल्यांपासून होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी चीनसह अनेक देशांकडून मदत मागितली होती. त्यांनी म्हटले होते की, इराणी हल्ल्यांपासून आपल्या तेल पुरवठ्याचे संरक्षण केल्याबद्दल चीन, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी अमेरिकेचे आभारी असले पाहिजे. चीन युद्धनौका पाठवण्यास तयार नसल्याने ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केले, ज्यामुळे ट्रम्प यांच्या मित्रपक्षांकडून त्यांच्यावर टीका झाली.

युद्धामुळे वाढलेले तेल दर, महागाई आणि राजकीय दबाव यामुळेही ट्रम्प प्रशासनावर ताण वाढला आहे. त्यामुळे परदेश दौऱ्यांपेक्षा देशांतर्गत आणि युद्धसंबंधित मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.