
मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री महोदयांनी, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी 50 टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सफाई कामगारांनी हक्काच्या घरासाठी आज आझाद मैदानावर कुटुंबासह आंदोलनही केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देण्याचे जाहीर केले होते. त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली होती. मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 36 वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे 12,200 नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी 50 टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव, यशवंत देसाई, अरुण नाईक आदी कामगार नेते उपस्थित होते.




























































