
माथेरानमधील पेव्हर ब्लॉक हटवण्याचा निर्णय आता सनियंत्रण समितीच्या कोर्टात गेला आहे. त्यासाठी माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अश्वपाल संघटनेला २० दिवसांची मुदत दिली आहे. त्यावर निश्चित तोडगा काढण्यात येईल असे सांगितल्याने घोडेबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हे आंदोलन मागे घेतल्याने आजपासून घोडेस्वारी पूर्ववत झाली आहे.
दस्तुरी नाका ते शिवाजी महाराज चौक या मार्गासह काही अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक टाकू नयेत, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तरीही बऱ्याच ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवल्याने रस्ते निसरडे बनून घोड्यांचे पाय घसरू लागले. त्यामुळे अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. पर्यटक घोड्यावर बसण्यास घाबरत असल्याने लवकरात लवकर पेव्हर ब्लॉक काढून टाकावेत या मागणीसाठी आजपासून अश्वपाल संघटनेने घोडेबंद आंदोलन पुकारले होते.
माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी आदींनी अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम व अन्य सदस्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. पेव्हर ब्लॉक हटवण्यासंदर्भात सनियंत्रण समितीसमोर प्रस्ताव ठेवणार असून त्यावर ल वकरात लवकर निर्णय घेऊ, असे लेखी आश्वासन अश्वपाल संघटनेला दिले आहे. दरम्यान, समाधानकारक तोडगा निघाला नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ई-रिक्षा संघटनेचे उपोषण सुरूच
माथेरानमधील सर्व हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा द्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने श्रमिक संघटनेने आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनावर समाधान न झाल्याने हे उपोषण पुढे सुरूच राहणार आहे





























































