दैव बलवत्तर! विमानातून पडूनही एअर होस्टेस बचावली, न्यूयॉर्कच्या विमान अपघातात नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूयॉर्कमधील ला गार्डिया विमानतळावर रविवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक विमान अपघात झाला. माँट्रियलहून आलेल्या ‘एअर कॅनडा एक्सप्रेस’च्या विमानाची धावपट्टीवर उतरताना अग्निशमन दलाच्या ट्रकशी भीषण धडक झाली. या भीषण धडकेत विमानाचा पुढचा भाग आणि कॉकपिट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, विमानातील दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, या भीषण अपघातातून विमानातील एक कर्मचारी अत्यंत चमत्कारिकरीत्या बचावली आहे.

सोलेंज ट्रेम्बले असे या एअर होस्टेसचे नाव असून त्या गेल्या 26 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या याच विमानात होत्या. या अपघातात सोलेंज ट्रेम्बले यांचा जीव थोडक्यात वाचला. विमानाची धडक इतकी भीषण होती की, सोलेंज बसलेल्या सीटसह विमानातून तब्बल 330 फूट दूर फेकल्या गेल्या. विमानाबाहेर पडल्यानंतरही त्या आपल्या सीटला बेल्टने बांधलेल्या अवस्थेतच होत्या. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या मुलीने या घटनेला ‘ईश्वराचा चमत्कार’ असे म्हटले असून, त्यांच्या पायाला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांच्यावर सध्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

या अपघाताच्या वेळी विमानाचा वेग ताशी सुमारे 160 किलोमीटर इतका होता. विमानाचे कॉकपिट अग्निशमन दलाच्या ट्रकच्या मधल्या भागावर आदळले, ज्यामुळे ट्रक उलटला आणि विमानाचे प्रचंड नुकसान झाले. एटीसी (Air Traffic Control) कडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक एका दुसऱ्या विमानातून येणाऱ्या जळलेल्या वासाची तपासणी करण्यासाठी धावपट्टीवर येत होता. ट्रकला थांबण्याचे वारंवार आदेश देण्यात आले होते, परंतु तांत्रिक त्रुटी किंवा गोंधळामुळे हा अपघात टाळता आली नाही.

या भीषण दुर्घटनेत विमानातील दोन्ही वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला. विमानातील 72 प्रवासी आणि कर्मचाऱ्यां पैकी सुमारे 41 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेक प्रवाशांना डोक्याला आणि गुडघ्याला जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर विमानातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांनी एकमेकांना मदत केली आणि आपला जीव वाचवला.

घटनेनंतर ला गार्डिया विमानतळ कित्येक तासांसाठी बंद करण्यात आले होते, ज्यामुळे शेकडो उड्डाणे रद्द झाली. या प्रकरणाचा तपास आता अमेरिकेचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) करत असून, एटीसी रेकॉर्डिंगमध्ये एका नियंत्रकाने “माझ्याकडून चूक झाली” असे म्हटल्याचे समोर आले आहे. हा अपघात मानवी चुकीमुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे, याचा अधिकृत अहवाल लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर भीषण अपघात; विमानाची अग्निशमन दलाच्या ट्रकला धडक, 4 कर्मचारी गंभीर जखमी