Ratnagiri News – पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल साठा जाहिर करा, ग्राहक पंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सद्यस्थितीत सर्व पेट्रोल, डिझेल आणि गॅस इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेतली. पुरेसा इंधन पुरवठा असल्याचे सांगण्यात येत असूनही ग्राहक पेट्रोलसाठी रांगा लावून असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.पेट्रोल पंपावर साठा जाहिर करा, अशी मागणी करण्यात आली.

पेट्रोल पंपवर साठ्याबद्दल सुस्पष्ट फलक लावावेत आणि त्यावर वेळ नमूद करून प्रति तीन तासांनी त्या त्या वेळेची साठ्याची माहिती प्रदर्शित करावी, अशी आग्रही मागणी ग्राहक पंचायतीने केली. याचवेळी शासनाने यांत्रिक शेती उपकरणे मोठ्या अनुदानाने वितरित केली असून त्यांच्यासाठी इंधनाची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना पुरेसे इंधन अखंड मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सध्या गॅस वितरकांकडे ऑनलाईन बुकिंग प्रमाणे नोंदणी झाल्यावर देखील दीर्घकाळ गॅस सिलेंडर दिला जात नाही. या ऐवजी ग्राहकांना रिकामा सिलेंडर आणा आणि भरलेला घेऊन जा, असे सांगण्यात येत आहे.

घरपोच गॅस सिलिंडर वितरण होत नसल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, रस्त्यांची कामे सुरू असताना, ग्राहक नाईलाजाने दुचाकी, चारचाकी, रिक्षा अशा असुरक्षित पद्धतीने भरलेले गॅस सिलेंडर नेत आहेत. या प्रवासात गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. तसेच वितरक डिलिव्हरी साठी मिळणारे पैसे ग्राहकाला परत देत नाहीत, अशी तक्रार करताना सिलेंडर घरपोच देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.