
बॉलिवूडमधील मु्न्नाभाई एमबीबीएस या सिनेमातील सर्किट म्हणजे, अभिनेता अर्शद वारसी याने नुकताच त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा केला. अर्शदने त्याच्या मुलाखतींच्या माध्यमातून कित्येकदा त्याच्या मुलांबद्दल ओझरते का होईना भाष्य केले आहे. अर्शद वारसीचा २१ वर्षीय मुलगा, झहीर वारसी याने सिद्धार्थ आनंद आणि राजू हिरानी यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून आधीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्याची १८ वर्षांची मुलगी, झेन झो वारसी, सध्या तिचे शिक्षण पूर्ण करत आहे, पण तिलाही चित्रपटांची तितकीच आवड आहे. असे अर्शदने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका पूर्वीच्या मुलाखतीत, अर्शद वारसीने आपल्या मुलांच्या चित्रपटसृष्टीत येण्याच्या इच्छेबद्दल आणि त्यासंबंधित आव्हानांबद्दल उघडपणे सांगितले होते. त्याने सांगितले की, त्याचा मुलगा आणि मुलगी दोघांनाही अभिनयात रस आहे, पण त्याने या व्यवसायातील अनिश्चितता देखील मान्य केली आहे. माझ्या मुलाला आणि मुलीला दोघांनाही अभिनय करायचा आहे. माझा मुलगा सध्या सिद्धार्थ आनंदचा सहाय्यक आहे आणि त्याने राजू हिरानीसोबतही काम केले आहे. साहजिकच सध्याच्या घडीला अभिनय हा सोपा व्यवसाय राहिलेला नाही. म्हणूनच १५० कोटी लोकसंख्येपैकी फक्त मूठभर जण अभिनय क्षेत्रात ठसा उमटवतात.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्शदचा असा विश्वास आहे की, ओळखीने सर्व दरवाजे उघडतात यापेक्षा बॉलिवूडमधील यश हे अजूनही वैयक्तिक मेहनत आणि नशिबावर अवलंबून आहे. अर्शद म्हणाला, “इथे कोणी कोणाला मदत करू शकत नाही. तुम्हाला तुमचा मार्ग स्वतःच तयार करावा लागतो. मी एखाद्या दिग्दर्शकाला फोन करून माझ्या मुलांवर करोडो रुपये खर्च करायला सांगू शकत नाही. कोणी माझ्या मुलावर विश्वास का ठेवेल? एखाद्या चित्रपट निर्मात्याने माझ्या मुलांना भेटायला बोलावणे म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घ्यावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे, जे मी करणार नाही. कोणी असे का करेल? जर मी चित्रपट निर्मात्यांना विचारले, तर ते माझ्या मुलांवर विश्वास का ठेवतील? मी माझ्या मुलांची शिफारस कोणाला का करेन?”
राज शमानीसोबतच्या एका अलीकडील पॉडकास्टमध्ये, अर्शद वारसीने आपल्या मुलांच्या अभिनय कारकिर्दीतील नशीब आणि दबावाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. त्याने स्पष्ट केले की अनेक प्रतिभावान लोक नशिबाच्या अभावामुळे अयशस्वी होतात, ही गोष्ट एक पालक म्हणून त्याला चिंतेत टाकते. तो म्हणाला की त्याला आशा आहे की, त्याच्या मुलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे काम नक्की मिळेल. शाहरुख खान किंवा हृतिक रोशनसारख्या स्टार्सच्या मुलांवर वेगळ्या प्रकारचा दबाव असतो—त्यांना अधिक मोठे व्हावे लागते. माझ्या मुलांवर मात्र तसा कुठलाही दबाव नाही.


























































