
जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक 19 एप्रिल 20269 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने लातूर ग्रामीण हद्दीत दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा जप्त केला आहे.
मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात पहिली कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी गोविंद दिगंबर खोसे (वय 38) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या 70 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या, ज्याची किंमत 3,500 रुपये इतकी आहे. दुसऱ्या कारवाईत माटेफळ शिवारातील तळ्याजवळ छापा टाकला असता, मलकू विठोबा पवार (वय 47) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1200 लिटर आंबट रसायन आणि 20 लिटर गावठी दारू असा 86,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 89,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, रसायनाचे नमुने घेऊन उर्वरित माल जागीच नष्ट करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे तसेच मुरुड पोलीस ठाण्याचे सफौ हिंगमीरे आणि बाबासाहेब खोपे यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुरुड पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































