
IPL 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची (MI) कामगिरी आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिली आहे. 5 पैकी 4 सामने गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे. मुंबईचे चाहते हार्दिकच्या कर्णधारपदावर नाराज असून सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे द्या, अशी मागणी सुद्धा चाहत्यांसह काही माजी खेळाडूंनी केली आहे. अशातच टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी हार्दिकच्या सध्याच्या फॉर्म आणि कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
आकाश चोप्रा यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक पंड्याच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, त्याने दीर्घकाळापासून कोणतीही मोठी मॅच-विनिंग खेळी खेळलेली नाही. केवळ छोट्या धावा करण्यापेक्षा संघर्षाच्या वेळी 70-80 धावांची मोठी खेळी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. हार्दिकच्या वैयक्तिक अपयशासोबतच मुंबई इंडियन्सची गोलंदाजी ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरली आहे. संघाने 5 सामन्यात 10.26 च्या इकॉनॉमी रेटने तब्बल 972 धावा दिल्या आहेत, ज्यामुळे फलंदाजांवर अतिरिक्त दबाव निर्माण होत आहे. गोलंदाज ना धावा रोखण्यात यशस्वी होत आहेत, ना ठराविक अंतराने विकेट घेऊ शकत आहेत. यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये संघ सध्या सर्वात खालच्या स्थानावर फेकला गेला आहे.
IPL 2026: पंजाबच्या धावांच्या डोंगरामागे होतं ‘हे’ खास कारण; कॅप्टन श्रेयसने केला खुलासा!
मुंबई इंडियन्सच्या गोटात सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत असून, कर्णधार बदलण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने संघात स्थिरता आणण्यासाठी पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याचा सल्ला दिला आहे. हार्दिकवर सध्या नेतृत्वाचा आणि स्वतःच्या कामगिरीचा प्रचंड दबाव असून, आगामी सामन्यात जर त्याने एखादी मोठी खेळी केली, तरच मुंबईच्या नशिबाचे चाक फिरू शकते, अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
























































