परीक्षण – परिपूर्ण आस्वाद समीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरविंद दोडे

एक जमाना होता सुरेल आणि अर्थपूर्ण गीतांचा. चित्रपटातील आणि चित्रपटबाहय़ गाण्यांनी केवळ आपलं रंजनच केलं असं नाही, तर प्रबोधन करून ज्ञानही दिलं. शब्दप्रधान गायकीच्या काळात जी अर्थपूर्ण गाणी तयार झाली, ती अजूनही गुणगुणली जात आहेत.

कवी विकास भावे यांचा ‘ओठावरली गाणी’ हा सांगीतिक संग्रह एक सुरेख रसास्वादाचा प्रत्यय देतो. 265 पृष्ठांच्या या पुस्तकात सर्वपरिचित आणि सर्वश्रृत गाणी आहेत. प्रत्येक आस्वादलेख रसपूर्ण आणि विवेचक आहे. ‘गंगा जमुना डोळय़ात उभ्या का’ यासारख्या गाण्यांना समीक्षेचे मापदंड लावणं म्हणजे त्या गाण्यांचा उपमर्द करणं होय, असं जनकवी पी. सावळाराम म्हणत असत. कविवर्य पी. सावळाराम यांची अनेक गाणी या संग्रहात विकास भावे यांनी रसग्रहणासाठी निवडली आहेत. त्यापैकीच हे एक गाजलेलं गाणं.  ‘ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु’ हे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं गाणं गायलं आहे. गायक जयवंत कुलकर्णी यांनी आणि संगीत दिलंय देवदत्त साबळे यांनी. अनेक पिढय़ांचं मन रिझवणारं हे तरुण गाणं. ‘डाव मांडून भांडून मोडू नको’ हे ना. घ. देशपांडे यांचं गाणं सुधीर फडके यांनी गायलं असून संगीत दिग्दर्शक आहेत राम फाटक. गाण्यातील संदेश खलील जिब्रानच्या बोधकथेप्रमाणे आहे.

‘आकाशी झेप घे रे पाखरा’, ‘जिंकू किंवा मरू’ यासारखी अनेक गाणी आहेत. त्याचबरोबर तो आणि ती यांची प्रेमगीतं, विरहगीतं आहेत. एवढंच नाही तर ‘श्रावणात घन निळा बरसला’ या श्रावण महिन्यात हमखास लागणाऱया गाण्याप्रमाणेच भक्तिगीतं, बालगीतांचंही रसग्रहण तुम्हाला वाचायला मिळेल. ‘आठवणी दाटतात’ यासारखी स्मरणरंजनाची गाणी व्याकूळ करतात आणि शंभर गाण्यांच्या रसग्रहणाचा हा संग्रह वाचून रसिक थक्क होतात.

जीवनगाण्यातला आनंद ओठावर येण्यासाठी अशी गाणी वाचायला आणि ऐकायलाही हवीत. कारण गाणं हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संग्रहातील शंभर गाण्यांच्या रसग्रहणाचा आस्वाद घेताना विकास भावे यांनी अत्यंत रसाळ भाषेत मधाळ गाण्यांवर केलेलं भाष्य लक्षवेधक आहे. ‘खुलविते मेंदी माझा रंग गोरापान’ या ‘भाऊबीज’ चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्याविषयी भावे लिहितात, ‘शरीराच्या सौंदर्याबरोबरच लज्जा हा स्त्राrचा दागिना आहे, जो तिचं लावण्य अधिकच आकर्षक करतो.’

अशाच एका गीतातील गोडवा अजूनही कायम आहे ते गीत म्हणजे, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ गीत आणि संगीत दोन्हीही यशवंत देव यांचं असून लतादीदींचा स्वर ऐकताना मनातील तरल भावना अंगावर रोमांच उभ्या करतात. गाणं ऐकताना प्रेमसाफल्याचा क्षण असाच थांबून राहावा असंच वाटत राहतं.

सुखाचं हे समाधान शब्दातीत असतं. संसारशांतीचा परमानंद यापेक्षा वेगळा नसतो. विकास भावे हे मूळचे कवी असल्यानं त्यांनी गाण्याच्या पाठीमागील गूढार्थ सहजपणे उलगडून दाखवलाय. संग्रहातील गाण्यांची निवड करताना त्यांनी दाखवलेलं विषयवैविध्य लक्षात येतं. देव, देश आणि धर्मभक्तीही यात आहेच. शिवाय बालगीत, प्रेमगीत विरहगीत… किती प्रकार सांगावेत? नवरसांनी परिपूर्ण अशी ही आस्वाद समीक्षा साधी आणि सुबोध आहे.

रेडिओचा जमाना धूसर झाला, पण जनमनातली ही गाणी वर्षानुवर्षे गायली जात आहेत हे या गाण्यांचं त्रिकालाबाधित्व आहे. कवी विकास भावे यांचा हा रसग्रहण संग्रह वाचताना आणि त्या त्या गाण्यातील वैशिष्टय़े टिपताना त्यांनी घेतलेले परिश्रम लक्षात येतात. तसंच या ग्रंथाची आणखी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे, शास्त्राrय संगीतावर आधारित गीतांची अचूक निवड. संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं नितीन आखवेलिखित ‘मी राधिका मी प्रेमिका’ या गाण्याच्या गायिका आहेत आरती अंकलीकर-टिकेकर. राधाभक्तीची अशी ओढ या गाण्याचा उत्कर्ष बिंदू आहे.

कवी विकास भावे मोजक्या शब्दांत गाण्याच्या श्रेष्ठतेचा आलेख रेखाटतात. यावरून असं दिसतं की, त्यांना ‘गाण्या’ची नस सापडलीय. गाण्याचे गीतकार, गायक आणि संगीतकार यांच्या नावासह ते प्रत्येक लेख परिपूर्ण करतात. या गाण्याचे सुप्रसिद्ध कवी म. पां. भावे यांच्याकडून त्यांना कवितेचा वारसा मिळाला आहे. संगीतकार अनिल-अरुण आणि गायिका आशा भोसले या त्रयींनी मिळून ‘स्वप्नातल्या कळय़ांनो उमलू नकाच केव्हा’ या गाण्याचं सोनं केलंय, ज्यामुळे म. पां. भावे हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. माणूस परिपूर्ण नसून पूर्णतेचा प्रवासी आहे, पण या प्रवासात अपूर्णतेची गोडीही जिवाला वेड लावते.

ओठावरली गाणी 

लेखक : विकास भावे ह प्रकाशक : संवेदना प्रकाशन

पृष्ठे : 268, ह मूल्य : 400 रुपये