आज वरळी बीडीडीत चाव्या वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 827 रहिवाशांचे प्रशस्त घराचे स्वप्न साकार होणार आहे. उद्या, गुरुवारपासून वरळीतील सुमेर केंद्र इमारतीच्या म्हाडा साईट कार्यालयात पुनर्वसन सदनिकांच्या वितरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वी वरळी बीडीडीतील 556 रहिवाशांना गेल्या वर्षी 14 ऑगस्टला घरांचा ताबा देण्यात आला होता.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 121 जुन्या चाळींतील 9 हजार 689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी 40 मजल्यांच्या 34 इमारती उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पामधील पुनर्वसन इमारत क्र. 1 मधील विंग ‘एफ’, ‘जी’ व ‘एच’ या विंगला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून या विंगमधील 827 पुनर्वसन सदनिकांचे वितरण म्हाडातर्फे करण्यात येणार आहे. सर्व पात्र रहिवाशांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत वाजता सार्वजनिक सुट्टी सोडून सदर वितरण पत्रांचे वाटप केले जाणार आहे. वितरण पत्र-ताबा स्वीकारतेवेळी लाभार्थ्यांनी पुनर्वसन सदनिका करारनामा, आधार कार्ड व पॅन कार्डची छायांकित प्रत, संक्रमण शिबीर सदनिकाधारकांचे हमीपत्र (500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नोंदणीकृत नोटरी केलेले), सदनिकाधारकांचे पासपोर्ट साईजचे 3 रंगीत फोटो, कुटुंबातील सदस्यांचा पोस्टकार्ड साईज एकत्रित फोटो या आवश्यक कागदपत्रांसह रहिवाशांनी व्यक्तिशः उपस्थित राहावे. तसेच सदनिकांचे वितरण ‘एफ’, ‘जी’ व ‘एच’ या विंगच्या क्रमाने करण्यात येणार असून वितरण पत्र स्वीकारण्याबाबतचे वेळापत्रक त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, ना. म. जोशी मार्ग, दादरच्या नायगाव येथील सुमारे 86 एकरवर वसलेल्या सुमारे 207 चाळींचा समावेश आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. ना. म. जोशी मार्ग प्रकल्पामध्ये 2 हजार 560 निवासी व अनिवासी गाळे असून 14 पुनर्वसन इमारती बांधल्या जात आहेत. नायगाव येथे 3 हजार 344 निवासी व अनिवासी गाळे 20 पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू आहे.

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे 160 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या बीडीडीवासीयांचे 500 चौरस फुटांच्या आलिशान घरात राहण्याचे स्वप्न या प्रकल्पामुळे साकार होत आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले. शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन तेथील कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. तसेच बीडीडीवासीयांना वेळेत नव्या घराचा ताबा मिळावा यासाठी वारंवार शासनाकडे, म्हाडाकडे पाठपुरावा करतात.