Ratnagiri News – महायुतीत बंडखोरी; रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिंदे गटाचा अपक्ष उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. खासदार सुनील तटकरे यांना विरोध करत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाचे आणखी एक उमेदवार अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणूकीत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला सोडण्यात आला. या मतदारसंघातून खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे निवडणूक लढवणार आहेत. तटकरेंना रायगडमध्ये असलेल्या विरोधाचे पडसाद उमटू लागले आहेत. तटकरेंना विरोध करत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी हिने आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले हेही अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महायुतीतील धुसफूस आज पुन्हा चव्हाट्यावर आली.