
उरणच्या बोरी स्मशानभूमीत भटकी कुत्री मृतदेहांचे लचके तोडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगर परिषदेत आवाज उठवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याठिकाणी रखवालदार नेमल्यास भटक्या कुत्र्यांची दहशत कमी होईल याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनी लक्ष वेधले. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी रखवालदार नेमण्याच्या ठरावाला विरोध केला. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून राजकारण बाजूला ठेवून मृतदेहाची होणारी विटंबना थांबवा, असे खडेबोल सुनावले आहेत.
उरण नगर परिषदेच्या हद्दीतील मोरा, भवरा, बोरी या तिन्ही स्मशानभूमीत रखवाल दार नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या स्मशानभूमींची दुरवस्था झाली असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. काही दिवसांपूर्वी बोरी स्मशानभूमीत वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी मृतदेहांच्या अवयवांचे लचके तोडल्याचे विदारक चित्र समोर आले होते. याबाबत सर्वसाधारण सभेत मृतदेहाच्या होणाऱ्या विटंबनेची बाब शिवसेना नगरसेवक अतुल ठाकूर व प्रमिला पवार यांनी व्हिडीओद्वारे निदर्शनास आणून दिली. नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीही हा विषय सभागृहात मांडला. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी या महत्त्वाच्या विषयात राजकारण करत रखवालदार नेमण्याचा ठराव मंजूर करून दिला नाही.
उरण शहरातील तीनही स्मशानभूमीत अगोदरपासूनच रखवालदारांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या नाहीत. सभागृहाने एकमताने निर्णय घेतल्यास रखवालदारांच्या नियुक्त्या करण्याची अंमलबजावणी प्रशासन करेल. – राजेंद्र घाडगे, प्रशासकीय अधिकारी






























































