CBSE OSM Controversy- अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे मूळ प्रकरण दडपण्याचा प्रकार, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मंगळवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (CBSE) अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची तडकाफडकी बदली केली आहे. सरकारच्या या कारवाईवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. यावर आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पदावरून हकालपट्टी करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. अधिकाऱ्यांच्या या बदल्या म्हणजे जबाबदारी निश्चित करणे नसून मूळ प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसने या संपूर्ण कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील ही कारवाई म्हणजे मुख्य मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी सरकारच्या या पावलाला ‘केवळ एक देखावा’ आणि ‘प्रकरण दाबण्याचा प्रयत्न’ असे संबोधले आहे. तर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यावर भाष्य करताना, हे म्हणजे मुख्य दोषीला कोणतीही शिक्षा न करता केवळ गुन्ह्याची कबुली देण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी या संपूर्ण प्रकरणात मोदी सरकारचा पर्दाफाश केल्याबद्दल तरुण पिढीचे  कौतुक केले आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात न्यायासाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवणे अत्यंत आवश्यक आहे. मंत्री प्रधान हे एका अत्यंत भ्रष्ट, अकार्यक्षम आणि अक्षम व्यवस्थेचे नेतृत्व करत असून या व्यवस्थेने देशातील लाखो तरुण विद्यार्थ्यांच्या भविष्याची आणि आयुष्याची वाताहत केली आहे, असा थेट आरोपही जयराम रमेश यांनी केला.