विराट कोहली वन डे मालिकेतून बाहेर; रोहितच्या तंदुरुस्तीबाबतही सस्पेन्स, 13 जूनला पहिला सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेपूर्वी हिंदुस्थानी क्रिकेट संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण स्टार फलंदाज विराट कोहली हा मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले असले तरी अद्याप हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृत घोषणा केलेली नाही.

कोहली मालिकेतून बाहेर राहिल्यास तब्बल 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दुखापतीमुळे संपूर्ण मालिका गमावण्याची ही त्याची पहिलीच वेळ ठरणार आहे.

टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोशेट यांनी कोहली आणि रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल असे सांगितले. वनडे मालिकेपूर्वी दोघांच्या फिटनेसचे अंतिम मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडेच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग दुसरे विजेतेपद मिळवून देण्यात कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात त्याने नाबाद 75 धावांची खेळी साकारली होती.

रोहित शर्माच्या फिटनेसवरही सर्वांच्या नजरा!

कोहलीप्रमाणेच माजी कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबतही अनिश्चितता कायम आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्याच्या अटीवर त्याची संघात निवड करण्यात आली होती. दुखापतीमुळे रोहितला आयपीएलमधील काही सामने मुकावे लागले होते. त्याच्या फिटनेसबाबतचा अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन आणि वैद्यकीय पथकाच्या अहवालानंतर घेतला जाणार आहे.