
महिला ग्राहकाची पूर्वसंमती न घेता घरगुती हेअर स्पा सेवेसाठी पुरुषाची नियुक्ती केल्याप्रकरणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने ‘अर्बन कंपनी’ला जोरदार दणका दिला आहे. शिवसैनिकांनी विक्रोळी येथील कार्यालयावर धडक देत याबाबत जाब विचारला. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून घरात सेवा पुरवताना महिलांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च संवेदनशीलता असणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी शिष्टमंडळाने मांडली.
अर्बन कंपनीच्या अॅपद्वारे एका महिलेने हेअर स्पा सेवा बुक केली होती. यावेळी महिलांसाठीची वैयक्तिक सेवा असतानाही कंपनीने पूर्वसूचना न देता पुरुष कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. ही बाब लक्षात येताच महिलेने सेवा रद्द केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच प्रकार घडल्याने महिलेने सेवा रद्द करून पैसे परत मागितले, परंतु कंपनीने ते दिले नाहीत. अखेर संतप्त महिलेने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे धाव घेतली. ही बाब लक्षात येताच शिवसेना सरचिटणीस निखिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने अर्बन कंपनीच्या विक्रोळी कार्यालयावर धडक दिली. हा विषय केवळ पैशांच्या परताव्याचा नसून महिलांची सुरक्षा आणि गोपनीयतेशी निगडित असल्याचे यावेळी निखिल सावंत यांनी ठणकावून सांगत सात दिवसांत लेखी खुलासा देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. योग्य उत्तर न मिळाल्यास शासकीय, नियामक व ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवण्याचा इशारा कक्षाने दिला आहे. यावेळी खजिनदार देविदास माडये, बबन सकपाळ, बाजीराव शेवाळे, अजय शिरोडकर, कृष्णकांत शिंदे, युवराज हांडे, यशवंत खोपकर, प्रकाश सावंत, विजय पवार, विश्वनाथ जाधव, निशिकांत भरेकर, शेखर यादव आदी उपस्थित होते.


























































