‘तो’ रिटेकच्या नावाखाली वारंवार चुंबन घ्यायचा; प्रिया बापटने सांगितला शूटिंगदरम्यानचा धक्कादायक अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपला ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट तिच्या बहुरंगी भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या प्रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सहकलाकाराने कशा पद्धतीने तिला त्रास दिला यावर प्रियाने एका मुलाखतीत भाष्य केले आहे. विशेष म्हणजे शूटिंग संपल्यानंतरही त्या अभिनेत्याने प्रियाशी संपर्क साधण्याचा आणि जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचे प्रियाने सांगितले.

प्रियाने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील एक अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक अनुभव शेअर केला आहे. हा प्रकार एका हिंदी चित्रपटाच्या सेटवर घडला होता. चित्रपटाच्या कथेनुसार दिग्दर्शकाने प्रियाला एक किसिंग सीन करण्यास सांगितल्यामुळे तिनेही त्या सीनसाठी होकार दिला होता. तिला चित्रपटात असे सीन करण्यास हरकत नव्हती, परंतु कथेनुसार त्याची गरज आहे का, असा प्रश्न तिच्या मनात होता. दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून तिने होकार दिला खरा, पण शूटिंग सुरू झाल्यावर परिस्थिती पूर्णपणे बदलली. शूटिंगदरम्यान तिचा सहकलाकार रिटेकच्या बहाण्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, चुंबन घ्यायचा. त्या वेळी मी इंडस्ट्रीत नवीन असल्यामुळे अशा प्रसंगाला कसे हाताळावे आणि स्वतःसाठी कशी ठाम भूमिका घ्यावी, हे मला समजले नाही,” असे ती म्हणाली.

हा त्रास केवळ कॅमेऱ्यासमोरच मर्यादित नव्हता. शूटिंग संपल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती, तिथेही हा प्रकार सुरूच होता. याविषयी बोलताना ती म्हणाली, “तो मला सतत मेसेज करायचा आणि स्वतःच्या रूमवर बोलावण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याला सतत नकार द्यायची, तरीही त्याचे मेसेज यायचे. असं माझ्यासोबत आधी कधीच घडलं नव्हतं.

या कठीण परिस्थितीत प्रिया दररोज रात्री फोन करून तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत याला सेटवर घडणारा सर्व प्रकार सांगायची. प्रियाचे बोलणे ऐकून उमेशने तात्काळ मुंबईवरून भोपाळ गाठले आणि तो थेट शूटिंगच्या सेटवर पोहोचला. उमेशला सेटवर पाहून त्या अभिनेत्याने स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आणि तो मागे हटला. तिच्या संपूर्ण करिअरमधील हा एकमेव अत्यंत वाईट आणि धक्कादायक अनुभव होता, असे प्रियाने सांगितले.

प्रिया बापट हिने ‘मुन्नाभाई MBBS’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ सारख्या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’ आणि ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.