
नव्वदच्या दशकामध्ये मेगास्टार चिरंजीवी यांनी एका चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे मानधन घेतले. तेव्हा एवढे मानधन घेणारे ते पहिले अभिनेते ठरले होते. त्यानंतर गेली तीन दशके बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार अभिनेत्यांनी या शर्यतीत वर्चस्व राखले. मात्र आता काळ बदलला असून दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला असल्याचे दिसून येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांच्या वादळामध्ये कमाईच्या बाबतीत आणि मानधनाच्या बाबतीतही बॉलिवूड स्टार थोडे मागे पडले आहेत. आता तर दक्षिणेकडील एका अभिनेत्याने चित्रपटासाठी तब्बल 300 कोटी रुपये घेत इतिहास रचला आहे.
‘झुकेगा नही साला’ म्हणत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या अल्लू अर्जुन याने ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटासाठी हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठे मानधन घेतले आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी केवळ आगाऊ फी घेतली नाही, तर चित्रपटाच्या नफ्यामध्ये मोठा वाटा घेतला होता. ‘पुष्पा 2’ ने जगभरात 1700 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आणि तब्बल 600 कोटींचा नफा कमावला. या नफ्यातील मोठा हिस्सा अल्लू अर्जुनच्या खिशात गेल्यामुळे त्याचे एकूण मानधन 300 कोटींच्या पार गेले आहे.
बाहुबलीच्या बजेटपेक्षाही जास्त मानधन!
अल्लू अर्जुनचे हे मानधन अनेक बिग बजेट चित्रपटांच्या एकूण निर्मिती खर्चापेक्षाही जास्त आहे. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलणारा आणि जगभर कमाईचे रेकॉर्ड मोडणारा एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली 2’ हा चित्रपट केवळ 250 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. म्हणजेच एका अख्ख्या बाहुबली चित्रपटापेक्षा जास्त पैसे अल्लू अर्जुनने एका चित्रपटासाठी घेतले आहेत.
रजनीकांत यांनाही टाकले मागे
गेली अनेक वर्षे बॉलिवूडचे तिन्ही खान हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे लागोपाठ हिट चित्रपट दिलेल्या शाहरूखने 200 कोटी मानधन घेतले होते. थलायवा रजनीकांत यांनी जेलर चित्रपटासाठी तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेत विक्रम केला होता. मात्र अवघ्या काही महिन्यात अल्लू अर्जुनने रजनीकांत आणि शाहरूख खान या दोघांनाही मागे टाकत नंबर 1 चे स्थान पटकावले. ‘हिंदुस्थान टाईम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
‘राका’ची तयारी सुरू
गेल्या पाच वर्षांत अल्लू अर्जुनने केवळ ‘पुष्पा’च्या दोन भागांमध्येच काम केले आहे. आता या ब्लॉकबस्टर प्रवासानंतर तो प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली यांच्या ‘राका’ या ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट डिसेंबर 2027 मध्ये रिलीज होणार असून यासाठी अल्लू अर्जुन किती मानधन घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






















































