इंडिया आघाडीची पुन्हा मोर्चेबांधणी! दिल्लीत आज महत्त्वाची बैठक, 23 पक्षांचे नेते उपस्थित राहणार; उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल, तामीळनाडूसह पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर ‘इंडिया आघाडी’ने पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली असून सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. ‘कॉन्स्टिटय़ुशन क्लब’मध्ये होणाऱ्या या बैठकीला 23 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने विरोधी पक्षाची भक्कम एकजूट दिसणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होणार आहेत.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बैठकीबाबत माहिती दिली. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे यांना वेणुगोपाल यांचा फोन

‘इंडिया’च्या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली.

या मुद्दय़ांवर होणार चर्चा

  • निवडणुकांमधील मतचोरी
  • संविधानावर होणारे हल्ले
  • विरोधी पक्षनेत्यांची गळचेपी
  • वाढती महागाई – बेरोजगारी
  • गुंतवणुकीसाठी मारक धोरण
  • राष्ट्रहितविरोधी परराष्ट्रनीती

‘टीव्हीके’वर चर्चा होणार

तामीळनाडूत द्रमुकचा पराभव झाला, तर थलपती विजय यांचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला. अपरिहार्य परिस्थितीत काँग्रेसने या पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे द्रमुकने इंडिया आघाडीशी फारकत घेतली आहे. हा पक्ष सोमवारच्या बैठकीत सहभागी होणार नाही. त्यामुळे ‘टीव्हीके’च्या इंडिया आघाडीतील समावेशावरही बैठकीत चर्चा होणार आहे.

गठबंधन नव्हे जनबंधन

‘इंडिया’च्या बैठकीची माहिती देताना जयराम रमेश यांनी ‘इंडिया जनबंधन’ असा शब्द वापरला आहे. ही ‘इंडिया जनबंधन’ची बैठक असून हिंदुस्थानची जी ओळख आहे त्याचप्रमाणे ‘इंडिया जनबंधन’ विविध पक्षांसोबत एकजूट होऊन उभा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या शब्दाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.